सातारा – सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेस 2022-23 या आर्थिक वर्षात करपूर्व 204 कोटी 29 लाख रुपयांचा विक्रमी ढोबळ नफा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ढोबळ करपूर्व नफा 40 कोटी 59 लाख रुपयांनी वाढला आहे, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष नितीन जाधव-पाटील यांनी दिली. ते म्हणाले, 2022-23 या आर्थिक वर्षात राष्ट्रीय व जागतिक चलनवाढीमुळे वाढलेले व्याजदर, करोना संकटानंतर अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम यामुळे अर्थव्यवस्था, बॅंकिंग, उद्योग व व्यवसाय या सर्वच क्षेत्रांमध्ये अडचणी निर्माण झाल्या.
या अडचणींवर मात करत सातारा जिल्हा बॅंकेने उल्लेखनीय कामगिरी करत, प्रगतीचा आलेख उंचावत ठेवला आहे. सहकार क्षेत्रात बॅंकेची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे. बॅंकेच्या आजपर्यंतच्या वाटचालीत सर्वांचे सहकार्य लाभले. त्यामुळे जिल्हा स्वयंपूर्ण होण्यासाठी आणि जिल्ह्याच्या आर्थिक विकासात बॅंक अग्रेसर राहिली आहे. दि. 31 मार्चअखेर बॅंकेचा संमिश्र व्यवसाय 15 हजार 198 कोटी रुपये झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत संमिश्र व्यवसायात 963 कोटी रुपयांची वाढ झालेली आहे. बॅंकेच्या ठेवी नऊ हजार 829 कोटी 42 लाख रुपये झाल्या असून, गतवर्षीच्या तुलनेत ठेवींमध्ये 707 कोटी 39 लाख रुपयांची वाढ झाली आहे. बॅंकेने वर्षाअखेर एकूण पाच हजार 368 कोटी 22 लाख रुपयांचे कर्जवितरण केले असून, त्यात गतवर्षीच्या तुलनेत 255 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. बॅंकेची गुंतवणूक पाच हजार 999 कोटी 96 लाख रुपये असून, गतवर्षीच्या तुलनेत 805 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. बॅंकेचा स्वनिधी 849 कोटी 61 लाख रुपयेअसून, गतवर्षीच्या तुलनेत यामध्ये 68 कोटी 81 लाख रुपयांनी वाढ झाली आहे. बॅंकेने सलग 16 व्या वर्षी नक्त अनुत्पादक कर्जाचे प्रमाण “शून्य टक्के’ राखण्यात यश मिळवले आहे.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅंकेमार्फत जिल्हा मध्यवर्ती बॅंकांना दिला जाणारा राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्कार, सातारा जिल्हा बॅंकेला सहा वेळा मिळाला आहे. दशकातील सर्वोत्कृष्ट जिल्हा बॅंक म्हणूनही सातारा जिल्हा बॅंकेला नुकतेच गौरविण्यात आले. बॅंक ग्राहकांना आधुनिक बॅंकिंग सेवासुविधा देत असून, त्यामध्ये प्रामुख्याने आरटीजीएस, एनईएफटी, मोबाइल बॅंकिंग, रूपे डेबिट कार्ड, किसान क्रेडिट कार्ड, किसान एम-पे ऍप, यूपीआय (भिम, गुगलपे, फोनपे) या सेवांचा समावेश आहे.
बॅंकेच्या 319 शाखा, 6 एटीएम आणि मोबाइल एटीएम आहेत. शेतकरी हा घटक ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. विकास सेवा सोसायट्या बॅंकेच्या प्रमुख घटक आहेत. या घटकांना दरवर्षीप्रमाणे 2022-23 या आर्थिक वर्षात लाभदायी योजनांच्या माध्यमातून मदत करण्याचा बॅंकेच्या संचालक मंडळाचा मानस आहे. बॅंकेच्या यशात ज्येष्ठ संचालक आ. रामराजे नाईक निंबाळकर, खा. उदयनराजे भोसले, आ. बाळासाहेब पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे, संचालक, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे योगदान आहे, असे नितीन पाटील यांनी सांगितले.