भोर -भोरमधून सकाळी नऊच्या सुमारास तीन बसमधून 62 मजूर कर्नाटककडे तर वर्वे खुर्द येथून 120 मजूर सहा बसेसने छत्तीसगडला असे एकूण 182 मजूर आपापल्या गावी रवाना करण्यात आले. यावेळी भोर आगार व्यस्थापक बी. एम. सूर्यवंशी यांच्यासह एसटी डेपोचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
भोर तालुक्यात कामधंद्याच्या निमित्ताने आलेल्या मजुरांची व इतर नागरिकांची सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे कुचंबणा सुरू होती. त्यांना पुन्हा त्यांच्या राज्यात मूळ गांवी रवाना करण्यात आले असून टप्याटप्प्याने उर्वरित सर्व मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात येणार असल्याचे भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी सांगितले.
भोर तालुक्यात सुमारे 6500, वेल्हे तालुक्यात 780 परप्रांतीय कामगारांनी नोंद केली असून, यात परराज्यात जाणारे 4400, तर राज्यांतर्गत जाणाऱ्या 2850 मजुरांचा समावेश आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, पश्चिम बंगाल आदी राज्यातील मजुरांचा यात समावेश आहे. या मजुरांकडून गावाला गेल्यावर होमक्वारंटाइन होण्याबाबतचे हमीपत्र घेण्यात आले असून सर्व कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव व तहसीलदार अजित पाटील यांनी सांगितले.