लोणी काळभोर -कुंजीरवाडी, थेऊरफाटा (ता. हवेली) येथील एका वस्तीवरील 35 वर्षांच्या तरुणाला करोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्याच्या संपर्कात आलेल्या 25 जणांची करोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मेहबूब लकडे यांनी दिली.
करोनाची लागण झालेला हा तरुण कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील पहिला तर पुणे-सोलापूर महामार्गावरील पूर्व हवेलीतील गेल्या 15 दिवसांतील हा नववा रुग्ण ठरला होता. त्यामुळे या परिसरात घबराट पसरली होती.
या रुग्णाचा इतिहास तपासून त्याच्या कुटुंबातील 6 व्यक्ती, अपघातानंतर त्याला रुग्णवाहिकेच्या माध्यमातून उपचारासाठी रुग्णालयात जाण्यासाठी मदत करणारे वडकी येथील 6 स्थानिक युवक, दोन्ही खासगी रुग्णालयातील 10 डॉक्टर-कर्मचारी व लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील 3 पोलीस कर्मचारी अशा 25 जणांची करोना चाचणी निगेटीव्ह आली आहे.
करोना रुग्ण सापडल्यानंतर येथील डॉ. राहुल वळके, डॉ. सुनील वाघमारे, राजेश जाधव, अशोक क्षीरसागर प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेऊन होते व स्थानिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना करीत असल्याने अद्यापपर्यंत पुन्हा करोना रुग्ण आढलेला नाही.