ओढा, सांडपाणी वाहिन्या, गटार स्वच्छतेची पालिकेकडून कामे
कात्रज – धनकवडी येथे राऊत बाग गुलाब नगर परिसरामध्ये गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे ओढ्याला पूर येऊन संरक्षक भिंती ढासळल्या होत्या. आसपासच्या इमारतींमध्ये पाणी शिरले होते. यावर्षी या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पालिकेची जोरदार तयारी सुरू असून त्यानुसार ओढा, सांडपाणी वाहिन्या, अंतर्गत गटारे स्वच्छ केली जात असल्याचे नगरसेवक बाळाभाऊ धनकवडे यांनी सांगितले.
यावर्षी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने पावसाळा पूर्व स्वच्छतेची कामे लवकर सुरू करण्यात आली आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे पुणे शहराला पावसाचा मोठा तडाखा बसून जीवितहानी व वित्तहानी झाली होती. त्यामुळे यावर्षी आंबील ओढ्याबाबत उपाययोजना केल्या जाणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर नाले, गटार सफाईची कामे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये धनकवडी येथील राजमुद्रा सोसायटी ते नवरंग सोसायटी पुढे साई जिम ते गुलाब नगर, राऊत बाग येथील नालेसफाई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे.