पुणे : व्यावसायिकाला पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून ससाणेनगर येथील युनिवर्सल शाळेशेजारी बोलवून तब्बल 18 लाख रूपये घेऊन पसार झाल्या प्रकरणात एकाला हडपसर पोलिसांनी अटक केली. त्याला १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
संजू ऊर्फ संजय भरत जगताप (वय ३१, रा. बदलापूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्या पत्नीसह अन्य तिघांवर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी बचाव पक्षातर्फे न्यायालयात अॅड.खंडेराव टाचले आणि अॅड.आकाश बिराजदार यांनी काम पाहिले.
याबाबत व्यावसायिक विनोद छोटेलाल परदेशी (रा. रामनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. अन्य फरार साथीदारांच्या शोधासाठी, गुन्ह्यातील रक्कम जप्त करण्यासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षाने केली होती. ती ग्राह्य धरून पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशी यांचा प्लॅस्टीक मोल्डींगचा व्यावसाय आहे. आरोपींनी संगणमत करून परेदशी यांना पैशाचा पाऊस पाडतो असे खोटे सांगुन पैशाचे आमिष दाखविले. त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.