एकूण रुग्णांची संख्या 9100च्या पार
पिंपरी – करोनाचा कहर सध्या चांगलाच वाढत चालला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये शहरातील 13 तर, शहराबाहेरील चौघांचा समावेश आहे. 547 जणांना नव्याने करोनाची लागण झाली आहे. गुरुवारी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या एकूण 547 रुग्णांपैकी 501 शहरातील आहेत. तर 46 रुग्ण हे शहराबाहेरील असून शहरात उपचार घेत आहेत.
शहरात रोज सुमारे पाचशे नवे बाधित आढळत असल्याने जुलै महिन्यात “करोना’च्या रुग्णांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गुरुवारपर्यंत शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या 9104 पर्यंत पोहचली आहे. तसेच याशिवाय शहराबाहेरील 273 करोनाबाधित शहरामध्ये उपचार घेत आहेत. शहरात आता “करोना’ चाचणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. असे असतानाही अजूनही 1675 संशयितांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. गुरुवारी 324 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकूण 5559 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरातील 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील मृतांमध्ये तब्बल 12 ज्येष्ठ नागरिक आहेत. नव्याने करोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये पिंपरी-चिंचवड परिसरातील 501 रुग्णांचा समावेश आहे. तर, शहराबाहेरील मात्र महापालिका रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 46 जणांच्या करोना चाचणीचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. करोनामुक्त झालेल्या 324 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. शहरात आत्तापर्यंत एकूण 9 हजार 104 करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यातील एकूण 5 हजार 559 रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.