भोपाळ – मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागलेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमल नाथ आता नवी जबाबदारी स्वीकारण्यास सज्ज झाले आहेत. ते यापुढे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सांभाळणार आहेत.
मध्यप्रदेशातील सत्ताबदलानंतर कॉंग्रेसने विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याचे नाव जाहीर केले नव्हते. आता विधानसभेचे अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर, कॉंग्रेसने विधानसभा सचिवालयाला एक पत्र पाठवले. त्यामध्ये आमचे सभागृह नेते नाथ असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे नाथ हेच विरोधी पक्षनेते बनणार असल्याच्या बाबीवर शिक्कामोर्तब झाले.
मध्यप्रदेशात 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने बाजी मारली. त्यानंतर नाथ मुख्यमंत्री बनले. मात्र, काही महिन्यांपूर्वी तरूण नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या 22 समर्थक आमदारांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. त्या बंडामुळे कॉंग्रेसला सत्ता गमवावी लागली. सत्ताबदलानंतर भाजपने त्या राज्यात सरकार स्थापन केले. आता कॉंग्रेसला प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका निभवावी लागणार आहे.