राजगुरूनगरातील शिबिरात माफक शुल्क ः नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
राजगुरूनगर -येथे महात्मा फुले समाज विकास प्रतिष्ठान, वैभव घुमटकर मित्र मंडळ व सेंटर फॉर इ गव्हर्नन्स ट्रेनिंग अँड रिसर्च पुणे यांच्या वतीने वाहन परवाना काढण्यासाठी आयोजित केलेल्या शिबिराला युवक-युवतींसह नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. दोन दिवसांत सुमारे 1500 वाहन चालकांनी वाहन चालविण्याच्या परवान्यासाठी (ड्रायव्हिंग लायसन्स) अर्ज दाखल केले आहेत.
राजगुरुनगर शहरात यापूर्वी पिंपरी आरटीओ कार्यालयातून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी कॅम्प घेतले जात होते; मात्र आता ते बंद झाल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. नागरिकांना भोसरीजवळ असलेल्या आरटीओ कार्यालयात जावे लागते, त्यात त्यांचा वेळ आणि पैसे जादा खर्च होत होते. शिवाय महिन्यातून एकदाच हा कॅम्प होत असल्याने मोठी गर्दी होत होती. स्थानिक एजंट यामध्ये नागरिकांची मोठी आर्थिक लूट करीत होते.
500 रुपयांच्या परवान्यासाठी हजार ते दीड हजार रुपये मोजावे लागत होते. मात्र या शिबिरात दुचाकी परवाना 350, चार चाकी परवाना 350 व दुचाकी व चारचाकी परवाना 500 रुपये असे माफक शुल्क आकारले जात असल्याने सर्वांच्या पैशाची बचत होत आहे.
या शिबिराचे उद्घाटन माजी उपनगरसेविका सारिका घुमटकर यांच्या हस्ते झाले. यावेळी वैभव घुमटकर, सुप्रिया घुमटकर, निलेश गवते, अमित घुमटकर, प्रदीप घुमटकर, योगेश पवार, संतोष भांगे, मीनाक्षी भांगे, सेंटर फ़ॉर इ गव्हर्नन्स ट्रेनिंग अँड रिसर्च पुणेचे सुरज पोळ, वृषभ पाटील, सुधीर चव्हाण, तुषार पवार, संतोष खेडकर, रवी लांडेयांच्यसह तालुक्यातील मोठ्या संख्येने परवाना काढण्यासाठी आलेले नागरिक उपस्थितीत होते.