सातारा – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेचा मेळावा बीकेसी मैदानावर होत आहे. या दसरा मेळाव्यासाठी सातारा जिल्ह्यातून 15 हजार शिवसैनिक जाणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, कास पठारावर होणाऱ्या महोत्सवाच्या अनुषंगाने काही बेकायदेशीर घडत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी एका उत्तरात दिला.
शिंदे गटाचा बीकेसी मैदानावर दि. 5ऑक्टोबर रोजी पहिल्यांदाच मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकनाथ शिंदे यांना मानणारे दोन लाख शिवसैनिक येणार असल्याचा दावा आहे. सातारा जिल्ह्यातही शिवसैनिकांनी जोरदार तयारी केली असून त्या संदर्भातील माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.
ते म्हणाले, “”दसऱ्याच्या मुहूर्तावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच या दसरा मेळाव्याचे आयोजन होत आहे. जिल्ह्यातून 180 लक्झरी बस आणि 640 वाहने जाणार आहेत. लक्झरी बस उपलब्ध झाल्या नाही तर एसटी बसचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातून 15000 शिवसैनिक उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बीकेसीच्या मैदानावर पोचतील अशी व्यवस्था करण्यात येत आहे.