खासदार सुप्रिया सुळे यांचा सरकारवर घणाघात
कुरकुंभ / यवत – सध्याचे सरकार असंवेदनशील आहे. केंद्र सरकारने दसऱ्याच्या आदल्या दिवशी सर्वसामान्य जनतेला गॅस दरवाढीचे बक्षीस दिले आहे. टीव्ही सुरू केला की मेळावा कोण घेणार याबाबच्या बातम्या दिसतात. परंतु मेळाव्याचा परिणाम महागाईवर होणार का? असा निशाणा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर साधला आहे.
खासदार सुळे यांचा मंगळवारी (दि. 4) पडवी, देऊळगाव गाडा, खोर, भांडगाव, यवत, कासुर्डी, भरतगाव, ताम्हणवाडी, बोरीऐंदी आदी गावांना गावभेट दौरा होता. दरम्यान त्यांनी पडवी (ता. दौंड) येथील सभेत महागाईच्या मुद्यावरुन सरकारवर निशाणा साधला. सणसूदीच्या तोंडावर गॅसची दरवाढ केली आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा हा दरवर्षी होत असतो. मग या गटाने सुडबुद्धीने दसरा मेळावा घेतला का? मुख्यमंत्री साहेब दररोज मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतात. हेच दोन तास जर मंत्रालयात दिले तर राज्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत होईल. जर मेळावे घेऊन महागाई कमी होणार असेल तर आणखी दहा मिळावे घ्या, पण महागाई आटोक्यात आणा, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी दौंडचे माजी आमदार रमेश थोरात, माजी सभापती मधुकर दोरगे, योगिनी दिवेकर, वंदना मोहिते, माजी सभापती राणी शेळके, माजी उपसभापती नितीन दोरगे, सरपंच संतोष दोरगे, पांडुरंग मेरगळ, युवानेते गणेश थोरात व ग्रामस्थ उपस्थित होते.