मुंबई – रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने वनिंदू हसरंगा, आकाश दीप, हर्षल पटेल व मंहमद सिराज यांच्या अत्यंत भेदक गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सचा डाव अवघ्या 128 धावांत गुंडाळला. कोलकाताच्या आंद्रे रसेलने आक्रमक खेळी केल्यामुळे त्यांना संघाचे शतक धावफलकावर लावता आले व प्रतिष्ठाही राखता आली.
– रहाणेला पुन्हा अपयश
– व्यंकटेश अय्यरकडून निराशा
– चौकार 11, षटकार 7
– सातत्याने एकेरी धावाही घेण्यात फलंदाज अपयशी
– उमेश व वरुणने केली 27 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी
बेंगळुरुचा कर्णधार फाफ डुप्लेसीने नाणेफेक जिंकत कोलकाताला पहिल्यांदा फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. संघाच्या 14 धावा असताना सलामीवीर व्यंकटेश अय्यरला आकाश दीपने बाद केले व तेथून त्यांच्या डावाला खिंडार पडले.
आकाश पाठोपाठ हसरंगाने आपल्या फिरकीच्या जाळ्यात भरात असलेल्या श्रेयस अय्यरसह सुनील नरेन, शेल्डन जॅक्सन व टीम साउदी यांना अडकवले. त्यानंतर पटेलने सॅम बिलिंग्ज पाठोपाठ आक्रमक फलंदाजी करत असलेल्या रसेलला बाद करत बेंगळुरुच्या मार्गातील मोठा अडसर दूर केला.
आकाश दीपने नीतिश राणा व उमेश यादव यांना तंबूचा रस्ता दाखवला. उमेशने आक्रमक 18 धावा केल्यामुळे संघाला शतकी मजल मारता आली. सिराजने अजिंक्य रहाणेला बाद करण्याची परंपरा पुन्हा एकदा जपली. कोलकाताचा डाव 18.5 षटकांत 128 धावांवर संपूष्टात आला. वरुण चक्रवर्ती 10 धावांवर नाबाद राहिला परंतू त्यांना पूर्ण 20 षटकेही खेळता आली नाहीत.
संक्षिप्त धावफलक – 18.5 षटकांत सर्वबाद 128 धावा. (आंद्रे रसेल 25, उमेश यादव 18, वरुण चक्रवर्ती नाबाद 10, वनिंदू हसरंगा 4-20, आकाश दीप 3-45, हर्षल पटेल 2-11, महंमद सिराज 1-25).