श्रीनगर – जम्मू-काश्मीर प्रशासनाने दहशतवादी संघटनांशी लागेबांधे असल्यावरून आणखी पाच सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले. त्यामध्ये दोन पोलिसांचाही समावेश आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये सरकारी सेवेत असणारे काही कर्मचारी दहशतवादी संघटनांना मदत करत असल्याचे समोर आले. तशा कर्मचाऱ्यांवरील आरोपांचा तपास करून त्यांच्या बडतर्फीची शिफारस करण्यासाठी मागील वर्षी एप्रिलमध्ये प्रशासनाने एक समिती नेमली.
त्या समितीच्या शिफारसींवरून आतापर्यंत 34 कर्मचाऱ्यांची सरकारी सेवेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. याआधी तशी कारवाई झालेल्यांत खतरनाक दहशतवादी सैद सलाहुद्दीन याच्या दोन मुलांचाही समावेश आहे. सलाहुद्दीन हा पाकिस्तानस्थित हिज्बुल मुजाहिदीन या संघटनेचा प्रमुख आहे. त्याशिवाय, कलंकित ठरलेला पोलीस अधिकारी देवेंदर सिंग यालाही बडतर्फ करण्यात आले.