ठाणे – राज्यात करोनाविरोधात लढा देणाऱ्या अनेक पोलिसांना करोनाचा संसर्ग झाला आहे. यात ठाण्यातील 125 पोलिसांनी यशस्वीपणे मात केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. यात 15 पोलीस अधिकारी आणि 110 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता 3 पोलीस अधिकारी आणि 62 कर्मचारी विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, या सर्व पोलिसांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
करोनाच्या विषाणूच्या कचाट्यात सापडलेले अनेक पोलीस कर्मचारी करोनाला हरवून सुखरूप घरी परतत आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयात आतापर्यंत 192 जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यात 18 पोलीस अधिकारी आणि 174 कर्मचाऱ्यांचा समावेश होता. तर एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
तर आतापर्यंत 65 पोलिसांवर अद्याप करोनावर उपचार सुरू आहेत. यात 3 अधिकारी आणि 62 कर्मचारी आहेत. त्यांच्यावर सध्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्व पोलिसांची प्रकृती स्थिर आहे. ते लवकरच बरे होऊन कर्तव्यावर रुजू होतील, असा विश्वास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.