अल-कायदाच्या उत्तर आफ्रिकेतील कमांडरचा खात्मा

माली येथील कारवाईचा फ्रान्स सैन्याचा दावा

बामाको- अल-कायदाचा उत्तर आफ्रिकेतील कमांडर अब्देलमालेक द्रौकदेल याचा फ्रान्सच्या सैन्याने खात्मा केला आहे. फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांनी काल (शुक्रवारी) रात्री याची घोषणा केली. साहेल इथे जिहादींबरोबर अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर फ्रान्सला हे मोठे यश मिळाले आहे. फ्रान्सच्या या दाव्यावर अल-कायदा इस्लामिक मेघरेब (एक्‍यूआयएम) कडून कोणतेही स्पष्टीकरण मिळू शकलेले नाही.

“अल-कायदा इस्लामिक मेघरेब’ ही अल-कायदाचीच शाखा मानली जाते. खंडणीसाठी शेकडो जणांचे अपहरण करण्यासाठी ही संघटना कुप्रसिद्ध झाली आहे. पश्‍चिम आफ्रिकेत या संघटनेने मोठा जम बसवला आहे. त्यामुळे त्या भागात मदतकार्यासाठी स्वयंसेवी संघटनांना पोहोचणे अवघड बनले आहे.

द्रौकदेल आणि त्याचे काही सहकारी बुधवारी उत्तर मालीमध्ये फ्रेंच आणि सहकाऱ्यांच्या सैन्याच्या कारवाईत मारले गेले आहेत, असे फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनी ट्विट केले आहे. मात्र, ठार झालेल्यांमध्ये द्रौकदेल होता, हे कसे ओळखले हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि मॉरिटानिया, माली, बुर्किना फासो, नायजर आणि चाड या “जी-5′ साहेल गटाच्या नेत्यांनी जानेवारीत या भागात जिहादींशी लढण्यासाठी नवीन योजना सुरू केली. त्यानंतर अल्पावधीतच द्रौकदेलच्या मृत्यूची बातमी मिळाली आहे. फ्रान्सने बुर्किना फासोमध्ये 600 अतिरिक्‍त सैनिक तैनात केले आहेत.

मार्चमध्ये दहशतवाद्यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये द्रौकदेल हा साहेल सरकारला फ्रेंच सैन्याला बाहेर काढण्याचे आवाहन करताना दिसला होता.

मालीमध्ये द्रौकदेल कधीपासून होता, हे समजू शकलेले नाही. बरीच वर्षे तो अल्जेरियाजवळच्या काबिलमध्ये होता. अल्जेरियाने त्याला का पकडले नाही, असा प्रश्‍नही उपस्थित केला जात होता. द्रौकदेलला उत्तर आफ्रिकेतील अल-कायदाचा म्होरक्‍या म्हणूनच ओळखले जात होते. गेल्या दशकभरापासून तो मालीमधून सक्रिय होता. म्हणून 2013 मध्ये फ्रेंच सैन्याने या भागात दहशतवाद विरोधी कारवाईला सुरुवात केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.