सांगली : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील 12 अन्य जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सांगलीतील कोरोना बाधितांची संख्या 23वर पोहोचली. या नव्या बाधितांमुळे इस्लामपूरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
इस्लामपुरातील एका मोठ्या कुटूंबातील एक दाम्पत्य सौदी अरेबियात जाऊन आले होते. काही दिवसांपुर्वी त्यांच्यासह अन्य दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याच कुटुंबातील अन्य पाच जणांना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सांगली जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले.
त्यांनी त्या कुटुंबातील अन्य 25 जणांचे नमुने तपासणीसाठी गुरूवारी रात्री पाठवण्यात आले. त्यात 12 जणांना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. या वृत्ताला जिल्हाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. या बाधितांमुळे महाराष्ट्रातील बाधितांची संख्या 147 वर पोहोचली आहे.
दरम्यान नागपुरात चार आणि गोंदियात आणखी एकाला बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. राज्यात लॉकडाऊन केले असून लोकांनी आपल्या घरात रहावे, असे आवाहन केले जात आहे. मात्र, तरीही लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे ही साथ पसरण्याचा धोका व्यक्त आहे.