-->

मंडई आजपासून सुरू

सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत होणार व्यवहार


खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचे होणार निर्जंतुकीकरण

पुणे – शहराच्या मध्यवर्ती भागाला फळे आणि भाजीपाल्याचा पुरवठा करणारी महात्मा फुले मंडई बुधवारपासून (दि. 15) पासून सुरू करण्यात येणार आहे. सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत आवारातील फळभाज्या, पालेभाज्या, कांदा-बटाटा, फळबाजार सुरू राहणार असून सोशल डिस्टसिंगची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांचे एका मशीनद्वारे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर, त्यांना खरेदीसाठी सोडण्यात येणार आहे, असे अखिल मंडई शेतीमाल संघटनेचे अध्यक्ष राजू कासुर्डे यांनी सांगितले.

शहराला फळे व भाजीपाल्याचा पुरवठा करणारा मार्केटयार्डातील घाऊक बाजार बंद आहे. त्यामुळे, शहरालगतच्या शेतकऱ्यांशी संपर्क करून भाजीपाला मागविण्यात येत आहे. शेतकऱ्यांकडून पहाटे तीनच्या नंतर फळभाज्यांची आवक होईल. त्यानंतर, सकाळी 7 पासून किरकोळ विक्रीपासून सुरवात होईल. केंद्र व राज्य सरकार यांच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करून बाजार सुरळीत ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. जीवनावश्‍यक वस्तू असलेल्या भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी संघटनेच्या वतीने सॅनिटायझर मशीन बसवण्यात आली आहे. त्याद्वारे खरेदीसाठी येणाऱ्या प्रत्येकाचे चारही बाजूने निर्जंतुकीकरण झाल्यानंतरच त्याला बाजारात खरेदीसाठी प्रवेश देण्यात येईल. त्यासाठी दररोज 85 लिटर सॅनिटायझर लागणार असून विक्रेत्यांकडून काढण्यात आलेल्या वर्गणीतून हा खर्च करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

गेल्या दोन दिवसांपासून मंडई बंद असल्याने किरकोळ बाजारात फळभाज्या व पालेभाज्यांचे भाव वाढले आहेत. किरकोळ विक्रेत्यांना घाऊक स्वरुपात माल मागवून त्याची विक्री करणे शक्‍य नव्हते. दरम्यान, मंडई सुरू झाल्यानंतर मंडईतून घाऊकसह किरकोळ खरेदी वाढेल. त्यानंतर, शहरासह उपनगरांतील फळभाज्या व पालेभाज्यांचे वाढलेले भाव खाली येतील, असे विक्रेते हर्षद करंजावणे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.