सातारा – जिल्ह्यातील 113 संशयितांना विविध ठिकाणच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात 5, कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये 71 व कराड उपजिल्हा रुग्णालयात 19, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात 11, कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयात 6 व वाईच्या ग्रामीण रुग्णालयात 1 अशा एकूण 113 जणांना करोनाचे संशयित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
आठ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असणाऱ्या एका संशयिताचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यापूर्वी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 2, कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील 2, कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयातील 2 व कृष्णा मेडिकल कॉलेजमधील अशा एकूण 7 संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.