विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची माहिती
पुणे – पुणे विभागातील करोनाबाधित रुग्णांची संख्या 518 झाली आहे. तथापि ऍक्टिव रुग्ण 404 आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. विभागात आतापर्यंत एकूण 518 कोरोनाबाधित रुग्ण असून एकूण 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्ह्यात 463 बाधित रुग्ण त्यापैकी 42 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत तसेच 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत विभागामध्ये एकूण 6 हजार 781 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 6 हजार 383 चा अहवाल प्राप्त आहे. तर 398 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 5 हजार 846 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 518 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकून 120 फ्ल्यू क्लिनिक स्थापन करण्यात आले असून त्यापैकी पुणे महानगरपालिका क्षेत्रात 73 क्लिनिक आहेत तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात 47 क्लिनिक आहेत. नागरिकांनी ताप, सर्दी यासारखी लक्षणे दिसल्यास तात्काळ फ्ल्यू क्लिनिकमध्ये जावून उपचार घ्यावेत, असे आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.
आजपर्यंत विभागामधील 35 लाख 59 हजार 992 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 1 कोटी 36 लाख 54 हजार 248 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 794 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.विभागात एकूण 5 हजार 971 नागरिकांना निरिक्षणाखाली होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यात 4 हजार 11, सातारा जिल्ह्यात 325, सोलापूर जिल्ह्यात 744, सांगली जिल्ह्यात 888 आणि कोल्हापूर जिल्ह्यात 03 नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
विभागात एकूण 1 हजार 969 नागरिकांना निरिक्षणाखाली संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यात 204, सातारा जिल्ह्यात 116, सोलापूर जिल्ह्यात 421, सांगली जिल्ह्यात 62 आणि कोल्हापूर जिल्ह्यात 1166 नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.