पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जपानी मेंदूज्वराला (जपानी एन्सेफलायटीस) अर्थात ‘जेई’ला आळा घालण्यासाठी पुणे शहरातील ० ते १५ वयोगटातील ११ लाख १८ हजार १९६ मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट महापालिका आरोग्य विभागाने ठेवले आहे. तर, राज्यात मार्चपासून पुण्यासह रायगड, परभणी या ‘जेई’ प्रभावित जिल्ह्यांमध्येही याची लस देण्यात येणार आहे. यानंतर या लसीचा समावेश नऊ महिने ते दीड वर्षाच्या मुलांना देण्यात येणाऱ्या नियमित लसीकरणातही होणार आहे.
मोहिमे अंतर्गत पुणे, रायगड, परभणी जिल्ह्यांमधील ५० लाख मुलांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये पुणे शहरातील लसीकरणाची मोहीम एक महिना सुरू राहणार आहे. या कालावधीत आरोग्य विभागाला लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार आहे. पुणे महापालिका आरोग्य विभागाला राज्य सरकारकडून लस उपलब्ध होणार आहे.
मार्चपासून लसीकरण सुरू करण्याचे नियोजन असल्याचे पालिका आरोग्य विभागाने सांगितले. या तिन्ही जिल्ह्यांतील सरकारी आणि खासगी शाळा, अंगणवाड्यांमध्येही लसीकरण मोहीम राबवण्यात येईल. मुलांना ०.५ मिलीचा एक डोस देण्यात येणार आहे. या आधी जेई लसीकरणाचा पहिला टप्पा झाला असून, त्यामध्ये गोंदिया, गडचिरोली, वर्धा, सोलापूर, भंडारा आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती.
डासांमार्फत जेई विषाणूचा प्रसार होतो. या विषाणूचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. त्यामुळेच लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि नियोजन सुरू करण्यात आले आहे. लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे. – डॉ. प्रवीण वेदपाठक, सहायक संचालक, राज्य कुटुंब कल्याण विभाग