पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना धमकी देणारे मेसेज केले जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी जगताप यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणी संबंधितांचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणीही जगताप यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काॅग्रेसमधील फुटीनंतर प्रशांत जगताप हे शरद पवार गटात राहिले. त्यातच निवडणूक आयोग तसेच विधानसभा अध्यक्षांनी खरी राष्ट्रवादी अजित पवार यांचीच असून पक्षचिन्ह तसेच पक्ष अजित पवार यांच्याकडे राहणार असल्याचा निकाल दिला आहे.
या निकालावरून जगताप यांंनी टीका केली आहे. तसेच जगताप यांच्याकडून केंद्र व राज्य शासनाविरोधात आंदोलने केली जात आहेत. असे असताना जगताप यांना गेल्या चार दिवसांपासून एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून धमकीचे मेसेज दिले जात असून ‘राजकीय भाष्य करू नये अन्यथा बघून घेऊ.. ! ’ अशा आशयाचा इशारा या मेसेजमधून दिला जात आहे. हा प्रकार वाढतच असल्याने जगताप यांनी सायबर पोलिसांत धाव घेतली आहे.