पुणे – पुणे शहरात पहिल्यांदाच “जपानी एन्सेफलायटिस’चा (जेई/मेंदूज्वर) रुग्ण आढळून आला. वडगावशेरी येथे राहणाऱ्या चार वर्षाच्या बालकाला त्याची लागण झाली आहे, त्याच्यावर ससून सर्वोपचार रुग्णालयातील बालरोग विभागात उपचार सुरू आहेत, त्याच्या रक्ताच्या चाचणीचा अहवाल एनआयव्हीने दिला, यातून हे निष्पन्न झाले आहे. ज्या भागात बालक राहते तेथे प्रतिबंधात्मक उपायच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत.
“जेई’ हा एक प्रकारचा विषाणूजन्य मेंदूला होणारा संसर्ग आहे, त्याला मेंदूज्वर असेही म्हणतात. यामध्ये रुग्णाच्या मेंदूला सूज येते सोबत ताप, डोकेदुखीही असते. याचा प्रभाव एक ते 15 वर्षाच्या वयोगटातील बालकांमध्ये जास्त आढळून येतो. प्रामुख्याने विदर्भात याचे रुग्ण आढळून येत असतात. जिल्ह्यातही पाच वर्षापूर्वी याचे रुग्ण आढळले होते.
या बालकाला नोव्हेंबरच्या सुरवातीला ताप आणि डोकेदुखी अशी लक्षणे होती. ताप वाढून तो मेंदूपर्यंत पोहोचला. त्यात त्याचा एक हात आणि पाय देखील कमकुवत झाला, त्याला सुरवातीला खासगी आणि नंतर ससूनमध्ये उपचारासाठी पाठवले. त्यानंतर हा बालक दहा दिवस रुग्णालयात उपचार घेत होता, आता त्याची प्रकृती बरी आहे.
“जेई’ विषाणूचे डुकरांमध्ये वास्तव्य…
“जेई’चे विषाणू हे बाधित डुकरांमध्ये मोठ्या प्रमाणात असतात, पण त्याचा त्यांना कोणताही त्रास होत नाही. परंतु, डासांमार्फत तो माणसांमध्ये संक्रमित होतो.
“कुलेक्स विष्णोयी’ डासांपासून प्रसार…
“कुलेक्स विष्णोयी’ आणि “क्युलेक्स ट्रायटनोरीन्क्स’ हे डास याचे प्रसारक आहेत. पाणथळ भागात या डासांची उत्पत्ती होत असते. तसेच झोपडपट्टी, जंगल, ग्रामीण भागातही हे डास आढळतात. तसेच डुकरांचा वावर असलेल्या ठिकाणी आणि पाणथळ जागी बगळे यांच्याकडून प्रसाराची शक्यता जास्त असते.
आतापर्यंतच्या इतिहासात पुणे शहरात “जेई’चा हा पहिलाच रुग्ण आढळून आला आहे. याआधी पुण्यात आढळून आले ते जिल्ह्यातील होते. या रुग्णाचा अहवाल मंगळवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आल्याने त्या रुग्णाच्या परिसरातील रुग्णांचे ताप सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. तसेच डास उत्पत्तीस्थाने शोधून तेथे प्रतिबंधात्मक उपाय करण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत. – डॉ. संजीव वावरे, साथरोग विभागप्रमुख, पुणे महापालिका