राजगुरूनगर – पिंपरी येथील स्वाईन टाऊन हौसिंग सोसायटी कडून खेड तालुक्यातील आरोग्य विभागाच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना 100 पीपीई किट, सॅनिटायझर व फेस शिल्ड देण्यात आले आहेत, अशी माहिती सभापती अंकुश राक्षे, गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका आरोग्य अधिकारी बळीराम गाढवे यांनी दिली. यापूर्वी तालुक्यात एका कंपनीकडून 300 पीपीई किट उपलब्ध झाल्या आहेत.
तालुक्यात भविष्यात करोनाचे रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून आवश्यक त्या उपायोजना केल्या जात आहेत. स्वाईन टाऊन हाऊसिंग सोसायटीकडे खेड पंचायत समितीच्या माध्यमातून मागणी केली होती. सोसायटीचे अध्यक्ष बबनराव भोसले यांनी त्यास तात्काळ मान्यता देत त्यांच्याकडून हे किट पंचायत समितीकडे देण्यात आले. यावेळी माजी उपसभापती भगवान पोखरकर, अधीक्षक रमेश उष्टे, विस्तार अधिकारी बापू कारंडे, बी. पी. माकर, रमेश भोगावडे आदी उपस्थित होते.
गटविकास अधिकारी अजय जोशी म्हणाले, ज्यावेळी रुग्ण पॉझिटिव्ह सापडले, त्यावेळी संबंधित डॉक्टर व कर्मचारी यांना उपलब्ध पीपीई किट देण्यात येणार आहेत. रेड झोनमधून येणाऱ्या नागरिकांना इन्स्टिट्यूट क्वारंटाइन करण्याची भूमिका घेतली आहे. सभापती राक्षे म्हणाले, तालुक्यात करोनाविरोधातील लढ्यासाठी खबरदारी घेतली आहे. करोना रुग्णांवर उपचार व तपासणीसाठी लागणारे आवश्यक पीपीई, फेसशिल्ड सारखे साहित्य सीएसआर फंड व दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहे, अजूनही काही देण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले.
तालुक्यात 16 चेकनाके
पंचायत समितीच्या अधिपत्याखाली 16 चेक नाके करण्यात आले आहेत. त्याद्वारे तालुक्यात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची नोंद ठेवण्यात येत आहे. यासाठी पोलिसांसह शिक्षक व कृषी सेवक यांची मदत घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आरोग्य केंद्रासाठी सीएसआर फंडातून 10 थर्मल स्कॅनर उपलब्ध करण्यात आले असून त्यांच्याद्वारे 16 चेक नाक्यांवर नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.
परप्रातीयांना सोडण्याचे नियोजन
खेड तालुक्यात परराज्यातील 475 विद्यार्थी राहत आहेत. तर तालुक्यात सर्वेक्षणानुसार 1 लाख 8 हजार कामगार राज्याच्या 14 जिल्ह्यातील व 11 परराज्यातील आहेत. त्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. सरकारने लॉकडाऊन उठवल्यानंतर गावाकडे सोडण्याचा निर्णय घेतला तर याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.