लोणावळा – लोणावळा शहरात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर शनिवारी पहाटेच्या दरम्यान जोरदार पाऊस पडला. केवळ तीन ते चार तासांतच याठिकाणी 100 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचा पाऊस बराच मागे पडला आहे.
पावसाने सर्वत्र ओढ दिली असली तरीही लोणावळा शहरात रोज दिवसातून कधितरी अधूनमधून पाऊस आपली हजेरी लावून जात आहे. पण त्याचे प्रमाण कमी असल्याने पाऊस असूनही नसल्यासारखा आहे. शुक्रवारचा संपूर्ण दिवस आणि रात्री उशीरा पर्यंत पावसाचा एकही थेंब पडला न्हवता, मात्र मध्यरात्री नंतर अचानक पाऊस बरसला. यामुळे फारसा फरक पडला नसला तरीही पावसाच्या एकूण मोजमापात वाढ झाली आहे.
मागील वर्षी 2 ऑगस्टच्या सकाळपर्यंत एकूण 4583 मिलिमीटर पाऊस नोंदवण्यात आला होता. तर यावर्षी एकूण 3806 मिलिमीटर इतका पाऊस मोजला गेला आहे.