सिंगापूरमधून 10 भारतीयांना परत पाठवले

सिंगापूर- करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या नियमांचा भंग केल्याबद्दल 10 भारतीयांना सिंगापूरमधून मायदेशी परत पाठवण्यात आले. या 10 जणांमध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या सर्वांना पुन्हा सिंगापूरमध्ये प्रवेश करण्यासही मज्जाव करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी जाहीर केले.

कायद्याचा मान ज्यांच्याकडून राखला जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यास सरकार मागेपुढे बघणार नाही, असा इशाराही सरकारने दिला आहे.

सिंगापूरमध्ये करोनाची साखळी तोडण्यासाठी 7 एप्रिलपासून “सर्किट ब्रेकर’ नियम लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व अनावश्‍यक व्यवहार बंद करण्यात आले आहेत. नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी करण्यात आली आहे. केवळ अन्नपदार्थ आणि किराणा सामानाची खरेदी करण्यासाठी किंवा घराजवळच व्यायाम करायला परवानगी दिली गेली आहे.

हा निर्बंधांचा कालावधी 2 जून रोजी समाप्त झाला आणि निर्बंध हटवण्याचा दुसरा टप्पा 19 जूनपासून सुरू झाला आहे. तेथे टप्प्याटप्प्याने उद्योगांना परवानगी दिली जात आहे. सिंगापूरमध्ये करोनाचे 45 हजार 961 रुग्ण आहेत.

भारतात परत पाठवण्यात आलेले 10 विद्यार्थी 5 मे रोजी आपल्या भाड्याच्या घरामध्ये एकत्रीकरण करताना सापडले होते, असे सिंगापूर पोलीस दल आणि इमिग्रेशन ऍन्ड चेकपॉईंट ऍथोरिटीने संयुक्‍तपणे प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या सर्वांना गेल्या महिन्यात दोषी ठरवण्यात आले आणि 1,439 डॉलर ते 3,237 डॉलरपर्यंतचा दंड आकारण्यात आला.

प्रथम गुन्हा करणाऱ्याला 6 महिन्यांच्या कारावासाची तरतूदही कायद्यात आले. तर पुन्हा असाच गुन्हा केल्यास वर्षभराची शिक्षा आणि 14,326 डॉलरच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे पास रद्द केले गेले आणि त्यांना भारतात परत पाठवले गेले.

Leave A Reply

Your email address will not be published.