महाबळेश्वर – छ. शिवरायांच्या अतुलनीय शौर्याची व पराक्रमाची साक्ष असलेल्या किल्ले प्रतापगडाच्या संरक्षण व संवर्धनासाठी लवकरच सुधारीत विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबरोबर बैठक घेऊन या आराखड्यास अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. या कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आ. मकरंद पाटील यांनी दिली.
मुसळधार पावसात दोन दिवसांपूर्वी किल्ले प्रतापगडाच्या तटबंदीखालील दरड कोसळली. त्यामुळे तटबंदीस धोका निर्माण झाला आहे. आ. मकरंद पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, पंचायत समितीचे उपसभापती संजय गायकवाड, प्रवीण भिलारे, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष रोहित ढेबे, चंद्रकांत उतेकर व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश गोंजारी यांनी सोमवारी किल्ले प्रतापगडाची पाहणी केली.
प्रतापगडाची कोसळलेली दरड, पूर्वी ठेकेदाराने किल्ल्यावर केलेले काम, तटबंदी, बुरुज, चोर व मुख्य दरवाजे, तलाव, विहिरी, छ. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, चबुतरा, गडाच्या पायऱ्यांची पाहणी आ. पाटील व मान्यवरांनी केली. त्यानंतर हस्तकला केंद्रात अधिकारी व ग्रामस्थांसमवेत बैठक झाली.
आ. पाटील म्हणाले, प्रतापगडाची दुरुस्ती व सुशोभिकरणाचा आराखडा व 13 कोटी रुपये निधी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2013 साली मंजूर केला होता. पहिल्या टप्प्यासाठी चार कोटी 65 लाख रुपये वर्ग करण्यात आले होते. हे काम कोकणातील ठेकेदाराने नोव्हेंबर 2013 मध्ये सुरू केले होते; पण ते निकृष्ट व संथ गतीने सुरू असल्याने 2018 साली ते बंद करण्यात आले. यापूर्वीचा आराखडा रद्द करून नवीन आराखडा करण्यात येईल.
पूर्वीच्या आराखड्यात नसलेल्या कामांचा समावेश करण्यात येईल. कोव्हिडच्या संकटामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला असला तरी खास बाब म्हणून प्रतापगडाच्या सुधारीत विकास आराखड्यासाठी निधी देण्यात येईल. राष्ट्रवादीचे सुभाष सोंडकर, संदीप मोरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश सपकाळ, सुरेश सावंत, विलास मोरे, विजय कासुर्डे, आनंद उतेकर, बबन कासुर्डे, अनिकेत रिंगे बैठकीस उपस्थित होते.