राजगुरूनगर – येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते विधी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी अभिरूप संसदेचे नुकतेच आयोजन केले होते यामध्ये संसदेचे कार्य अनुभवले. यात सत्ताधारी व विरोधकांची खडाजंगी आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरली.
हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरसेनापती हंबीरराव मोहिते विधी महाविद्यालय व विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने थोर क्रांतीकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या 111 व्या जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थी अभिरूप संसदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले. यावेळी खेड तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुभाष कड, संस्थेचे सरचिटणीस प्राचार्य डॉ. शिवाजी मोहिते, संस्थेच्या खजिनदार सुरेखा मोहिते पाटील, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, डेहणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडूरंग मुळूक, रत्नाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल पवार, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. किरण शिंदे, सर्व विद्यार्थी,प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान, विविध खात्यांचे मंत्री, खासदार, सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष या पद्धतीमध्ये संसदेचे कामकाज सुरू करण्यात आले. प्रथम सर्वांना पद व गोपनियतेची शपथ देण्यात आली. त्यानंतर विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षाला अनेक वास्तव प्रश्न विचारत धारेवर धरले. त्याला सत्ताधारी पक्षाच्या संबंधित मंत्र्यांनी समर्पक उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. भोजनानंतर दुपारच्या सत्रामध्ये राज्यघटनेच्या कलम 370 व तिहेरी तलाक या दोन्ही विधेयकांवर सखोल चर्चा करून बहुमताने ही दोन्ही बिले पारित करण्यात आली. शेवटी राष्ट्रपतींनी दोन्ही विधेयकांवर स्वाक्षरी केली.
विधी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. किरण शिंदे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. शिवाजी बिबे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. राजाराम गरूड, प्रा. किरण काळे, प्रा. निलिमा फोकमारे, प्रा. राणी चव्हाण, प्रा. प्रिती पवार, ग्रंथपाल प्रा. अजय कावळे, श्री. अभिजीत शेवाळे, सौ. प्रतिभा घेवडे, विनय बोरूडे, मंदा पानमंद, किरण निंबाळकर तसेच कमवा व शिका योजनेतील विद्यार्थी ,स्वयंसेवक व सर्व विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.