संगमनेर – कोविड-19 विषाणूचा जिल्ह्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, स्थानिक पातळीवरच संशयीत रुग्णांबाबत सत्यापन व्हावे, यासाठी संगमनेर येथून पाठविलेला स्वतंत्र ट्रुनॉट प्रयोगशाळेचा प्रस्ताव एम्सने मंजूर केला आहे.
त्यामुळे आता संशयीत रुग्णांचा या तंत्रज्ञानाच्या आधाराने अवघ्या तीस मिनिटांत अहवाल प्राप्त होणार आहे. केवळ संशयीत म्हणून जिल्हा रुग्णालयाकडे पाठविल्या जाणाऱ्या स्त्राव नमुन्यांवरही मोठे नियंत्रण येवून जिल्हा यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
9 एप्रिल रोजी घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने नागपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट्स ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) या शासकीय संस्थेशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. येथील रुग्णालयाची प्रशस्त इमारत, आवश्यक असलेली साधसामग्री आणि समर्पित भावनेतून चोवीस तास सेवा देणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, याबाबत एम्सला माहिती देवून संगमनेरात ट्रूनॅट तंत्रज्ञानाद्वारा कोविड तपासणीसाठीची परवानगी मागण्यात आली होती.
त्यासाठी संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भास्कर भंवर, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया यांनी डॉ. सीमा घोगरे, खासगी रुग्णालयाचे डॉ. अमोल कासार, डॉ. विनोद आव्हाड व डॉ. अमोल पाठक यांच्या सहकार्याने घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीचा प्रस्ताव तयार करुन एम्सला पाठविला होता.
या प्रस्तावाला नागपूरच्या एम्सने नुकतीच परवानगी दिली असून, आता यापुढे घुलेवाडीतच संशयीत रुग्णांचा स्त्राव घेवून त्याला कोविडची लागण झाली किंवा नाही, याचे सत्यापन केले जाणार आहे. सदरची चाचणी अंतिम नसून, प्राथमिक स्वरूपाची असणार आहे. मात्र या चाचणीत स्त्राव अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यास संबंधित संशयीत रुग्णाची पुढील परवड संपुष्टात येणार आहे. ज्या रुग्णाचा अहवाल या चाचणीतून पॉझिटिव्ह ठरेल, त्याच रुग्णाचा स्त्राव दुसऱ्या व अंतिम चाचणीसाठी जिल्हा प्रयोगशाळेकडे पाठविला जाणार आहे.
अर्थात ट्रूनॅट तंत्रज्ञानातून पॉझिटिव्ह ठरलेली व्यक्ती बाधितच असेल, असेही नाही, तर जिल्हा प्रयोगशाळेतील चाचणीत अशा रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह येण्याची शक्यताही असणार आहे. यापूर्वी बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांचेच स्त्राव घेवून ते जिल्हा प्रयोगशाळेकडे पाठविले जात असल्याने तेथील यंत्रणेवरही मोठा ताण येत आहे.
मात्र आता अशा प्रत्येक व्यक्तिची ट्रूनॅट तंत्रज्ञानातून प्राथमिक चाचणी होणार असल्याने जिल्हा प्रयोगशाळेकडे सरसकट स्त्राव नमुने न पाठवता केवळ पॉझिटिव्ह असण्याची शक्यता असलेले स्त्राव नमुनेच पाठविले जातील. त्यामुळे जिल्हा यंत्रणेवरील ताणही कमी होणार आहे.