काठमांडू- नेपाळमधील राजकीय संकट आता अधिक गंभीर झाले असून देशाच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या स्थायी समितीची आज होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान पुष्पकुमार दहल प्रचंड आज होणाऱ्या बैठकीसाठी आलेच नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षात आता फूट अटळ असल्याचे मानले जाते आहे. दरम्यान, पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.
प्रचंड आणि ओली यांच्यात काल तीन तास चर्चा झाली होती. मात्र त्यातून कोणताही तोडगा निघू शकला नव्हता. आज सकाळी या दोन्ही नेत्यांची पुन्हा चर्चा होणार होती. त्यानंतर स्थायी समितीची बैठक होणार होती. मात्र सकाळची चर्चाच झाली नसल्यामुळे समितीची बैठक 6 तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. प्रचंड आणि ओली दोघेही नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. आता ओली यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी पक्षातून केली जात आहे. प्रचंड यांचा गट राजीनाम्यासाठी आग्रही आहे. मात्र ओली यांचा नकार आहे. ओलींनी राजीनामा द्यावा आणि प्रचंड यांना आपल्या मर्जीने पक्ष चालवू द्यावा अशी त्यांच्या गटाची मागणी आहे. पक्ष आणि सरकार यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. तसेच एक व्यक्ती एक पद याकरता प्रचंड आग्रही आहेत.