पुस्तक परीक्षण : एका शिकारीची गोष्ट

-अशोक सुतार

डॉ. रूपेश पाटकर यांचे “एका शिकारीची गोष्ट’ हे पुस्तक म्हणजे पर्यावरणवादी कार्यकर्त्याने प्रस्थापित लोकांशी दिलेल्या लढ्याची वास्तव दीर्घकथा होय. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत अनिल अवचट म्हणतात, “राजेंद्र केरकर या पर्यावरणवादी कार्यकर्त्यांवर लिहिलेले हे पुस्तक चित्तथरारक रहस्य कथेसारखे उत्कंठा वाढवत नेणारे आहे’.

गावात वाघाची शिकार झाली, तेव्हा कथानायक ही घटना दिल्लीपर्यंत पोहोचवतो. शिकारी गावातलेच असल्यामुळे राजेंद्रच्या कुटुंबावर गाव बहिष्कार टाकते. त्याही परिस्थितीत अनेक धोके पत्करून त्या प्रसंगांतून कथानायक बाहेर येतो. कथानायकाची पत्नी पौर्णिमा म्हणते, “तुमच्या जीवाला काही बरे वाईट झाले असते तर आमचे काय झाले असते?’ राजेंद्र शांतपणे म्हणतो, “तुला नोकरी आहे, घर आहे. तू कामही पुढं चालवलं असतंस’. जीवनमूल्यांच्या एकनिष्ठेमुळे आलेले हे धैर्य कथानायकाची जमेची बाजू आहे. या बळावरच राजेंद्र केरकर पर्यावरणाला बाधा आणणाऱ्या बीभत्स, बुभुक्षित प्रवृत्तीविरोधात ठामपणे उभे आहेत. हे पुस्तक पर्यावरणाचे रक्षण करण्यासोबत मूल्यनिष्ठा बाळगण्याची प्रेरणा देते. मुंबईतील लोकवाङ्‌मय गृह प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

या पुस्तकातील कथा गोव्याच्या सत्तरी परिसरात घडली. केरी गावाजवळच्या म्हादई जंगल परिसरात वाघाला शिकाऱ्यांनी फासात अडकवून त्याला गोळी घालून ठार मारले. अशी बातमी मिळताच राजेंद्र केरकर फोटो, पुरावे गोळा करतात आणि वृत्तपत्रात त्याची बातमी देतात. बातमी छापून आल्याने राजेंद्रने गावाचे नाव बदनाम केल्याची भावना गावकऱ्यांमध्ये पसरते. राजेंद्रच्या घरावर बहिष्कार टाकला जातो. परंतु कथानायक हार मानत नाही. वाघ व त्याचे अस्तित्व तसेच सर्व पशुपक्ष्यांचे अस्तित्व म्हणजे जंगलातील परिसंस्था असते. निसर्ग व सर्व सजीव एकमेकांवर अवलंबून असतात. त्यामुळे वाघाची हत्या हा गंभीर गुन्हा असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात येत नाही; परंतु नायक वाघाच्या शिकारीचे प्रकरण थेट दिल्लीपर्यंत पोहोचतो.

गोव्याजवळच्या म्हादई जंगलात वाघ अस्तित्वात नाहीच, अशी हाकाटी पिटणारे खाणमालक, उद्योजक व सरकार यांना हे वाघाचे प्रकरण म्हणजे मोठा धक्‍का होता. त्यामुळे जंगलात वाघ आहेत, हे सिद्ध होत होते, याकडे नायक न्यायसंस्था, केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेतो. नायकाच्या अथक प्रयत्नाने संशयित शिकाऱ्यांची चौकशी होते, ते गुन्हा कबूल करतात, त्यांना शिक्षाही होते; परंतु नायकाने दिलेला लढा सहजसोपा नव्हता. ज्या वन अधिकाऱ्यांना वाघाची शिकार झाल्याचे माहीतच नव्हते, त्यांनी ही बातमी, फोटो कोणी दिले असे दरडावत नायकावरच गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली; परंतु पर्यावरणाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कथानायकाने आपले जीवन वेचले आहे. शिकार झालेल्या वाघाला कथानायकाने न्याय मिळवून दिला.

पर्यावरण क्षेत्रात प्रबोधन करणे महत्त्वाचे आहे. जर आपली पिढी पर्यावरण वाचवू शकली नाही तर भावी पिढ्यांच्या नशिबी इतकी भयानक अवस्था येईल की, त्यापुढे कोणतीही शिक्षा कमीच असेल. कथानायकाची जिद्द, पर्यावरणासाठी लढा देण्याची वृत्ती या पुस्तकात दिसून येते.

Leave A Reply

Your email address will not be published.