हेमामालिनींची शेतकऱ्याची भूमिका

निवडणुकांच्या प्रचारात उमेदवार प्रचारांचे वेगवेगळे फंडे’ स्वीकारत असतात. त्यात गरिबांमध्ये मिसळणे, त्यांच्याबरोबर अगदी त्यांच्या घरात जाऊन जेवणे, त्यांच्याबरोबर पाट्या उचलण्याचे काम करणे, तरुणाईबरोबर संवाद साधणे… अशा अनेक गोष्टी अवलंबिल्या जातात. मतदारांना हे काही नवीन नाही; पण सध्या सिनेस्टार हेमामालिनी यांनी आपल्या प्रचाराची शेतकऱ्यांना आपलेसे करण्याची जी कला आत्मसात केली आहे, ती खऱ्या अर्थाने चर्चेचा विषय ठरते आहे.

पिवळ्या रंगाची साडी आणि पूर्ण मेक-अप’मध्ये मथुरेतील शेतकऱ्यांबरोबर गव्हाची कापणी करणाऱ्या हेमामालिनी यांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. वेगवेगळ्या पोज’मध्ये शेतात काम करणाऱ्या महिलेची भूमिका’ करत त्यांनी या निवडणूक प्रचारात बाजी मारल्याचे दिसत आहे.

हेमामालिनी… वय वर्षे अवघे 70… मात्र आपल्या अदाकारीने कायमच त्यांनी रसिकांना आकर्षित केले आहे. 2000मध्ये त्यांच्या कार्यासाठी पद्मश्रीने त्यांना गौरविण्यात आले… 2004 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीला कलाटणी मिळेल. ज्या क्षेत्रात जातील ते क्षेत्र गाजवायचे… हा त्यांचा फंडा असला तरी संसदेत मात्र त्यांचा ठसा फारसा दिसून आला नाही. 2003 ते 2009 राज्यसभेचे सदस्यत्व सांभाळले तर 2014मध्ये उत्तर प्रदेशातील मथुरेतून त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि त्या निवडूनही आल्या.

मात्र, आता 2019च्या निवडणुकीत त्यांचे वेगळेच रूप मथुरेच्या मतदारांना पाहावयास मिळत आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करणारे सत्ताधारी असा भाजपचा प्रचार सध्या विरोधक करीत असले तरी हेमामालिनी आपल्या प्रचार कार्यातून शेतकऱ्यांसाठी काम करणारे व्यक्तिमत्त्व अशीच भूमिका’ बजावत आहेत. पूर्णतः मेक-अप’मध्ये असलेल्या हेमा मालिनी या हिरव्या रंगाच्या साडीत गॉगल लावून मेक-अप’ उतरणार नाही, याची काळजी घेत हेलिकॉप्टरमधून उतरल्या आणि गव्हाची कापणी करू लागल्या… आणि आता गुलाबी साडीत गॉगल लावून त्या स्वतः ट्रॅक्‍टर चालवत शेतात आल्या. त्यांचे हे रूप बसंती’पेक्षा वेगळे असले तरी मथुरेतील मतदारांना किती भावते हा खरा प्रश्‍न आहे.

चित्रपटातील भूमिका’ वठवणे वेगळे आहे आणि लोकसभेच्या निवडणुकांच्या प्रचारात स्वतःचे अस्तित्व टिकवणे वेगळे आहे. हेमामालिनी यांचा दुर्गा’ बॅले कितीही प्रसिद्ध असला तरी संसदेच्या व्यासपीठावर दुर्गे’च्या अवतारात त्या कधीच दिसल्या नाहीत, हेही तितकेच मान्य करावे लागेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.