‘यशवंत’ सुरू करण्याच्या केवळ वल्गनाच – शरद पवार

इंदापूर – राज्याचे मुख्यमंत्री माझ्यावर टीका करतात हेच मुख्यमंत्री शंभर दिवसांत थेऊरचा यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करून दाखवेल असे बोलून दाखवत होते मात्र, त्यांनी केलेले वक्‍तव्य आजतागायत वल्गना ठरल्या आहेत. गांधी-नेहरू यांच्यानंतर माझ्यावर भाजपचा सातत्याने प्रहार होत आहे. यामध्ये मी ऊसाला साखरेला दर मागितला म्हणून थेट पंतप्रधान आरडाओरडा करीत आहेत. मात्र, उसाला साखरेला दर मागणे म्हणजे काय गुन्हा आहे का? असा सवाल माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस व आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या सांगता सभा इंदापूर येथे झाली, त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रवीण माने, बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने, मंगल सिद्धी परिवाराचे प्रमुख राजेंद्र तांबिले, बाजार समितीचे उपसभापती यशवंत माने, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष कृष्णाजी यादव,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे संजय सोनवणे व सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे व दोन्ही मुले यांच्यास नागरिक उपस्थित होते होते.

खासदार सुळे म्हणाल्या की, इंदापूर तालुक्‍यातील जनता अतिशय हुशार आहे विधानसभेच्या कालावधीत भाजपने गाजराचा पाऊस पडला. मात्र, इंदापूरच्या जनतेने त्या पावसाची कदर केली नाही. लोकसभा मतदारसंघात पासपोर्ट कार्यालय, एमआयडीसी रस्ते रेल्वेचे प्रलंबित प्रश्‍न, आरोग्याच्या सेवा अशी कामे केली आहेत. जर कॉंग्रेस-राष्ट्रवादीने 60 वर्षांत काही केले नसते तर व शाळा-महाविद्यालये काढले नसते तर भाजपवाले अंगठेभादुर झाले असते, असे त्यांनी नमूद केले.

कर्जमुक्‍ती देण्याची बारामतीत दिली ग्वाही
राज्यातील प्रश्‍नांबाबत तसेच विकासाच्या मुद्द्यांबाबत न बोलता केवळ गांधी कुटुंबावर टीका करणे इतकेच काम पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी केले. आमच्या काळातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. मात्र, गेल्या पाच वर्षांत 11 हजार 998 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या केल्या, अशी माझी माहिती आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर कर्जमुक्‍तीची गरज आहे, ही कर्जमुक्‍ती कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार देईल, अशी ग्वाही शरद पवार यांनी बारामती येथील सांगता सभेत दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.