प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी आणणार – गिरीश बापट

मेट्रो, पीएमआरडीए, विमानतळ, पाणीपुरवठ्यावर लक्ष : ‘जायका’ प्रकल्पही मार्गी लागल्याचा दावा

पुणे – “पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने अनेक योजना जाहीर केल्या आहेत. परंतु शहराशी संबंधित आठ मुद्द्यांवर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामध्ये मेट्रो, पीएमआरडीए, विमानतळ, चोवीस तास पाणीपुरवठा, नदीसुधार, स्मार्ट सिटी, कचरा प्रकल्प, रेल्वेचा लोणावळापर्यंत प्रकल्प होणार आहे. पुण्यातलाच असल्याने शहरातील सगळे प्रश्‍न माहिती आहेत. अनेक प्रश्‍न सोडवले आहेत. पालकमंत्री म्हणूनही अनेक प्रश्‍न हाताळले आहेत. जे प्रकल्प सध्या सुरू आहेत, त्याच्या पूर्णत्त्वासाठी केंद्रातून निधी आणणार,’ असा विश्‍वास महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी केले.

“राष्ट्रीय महामार्ग हा देखील महत्त्वाचा विषय आहे. चांदणी चौकासाठी साडेचारशे कोटी रुपयांचा निधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. भूसंपादनासाठी 195 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे बापट यांनी सांगितले. मेट्रोचे नव्याने तीन-चार डीपीआर तयार आहेत. मुख्य स्टेशन्स झाल्याशिवाय काही करता येणार नाही. त्याचाही विचार सुरू असल्याचे’ बापट यांनी नमूद केले.

“या सगळ्या प्रकल्पांमध्ये “जायका’ प्रकल्पालाच वेळ लागला. कारण याचा सगळा अहवाल राज्याला पाठवावा लागतो. तेथून केंद्राला आणि तेथून जपानला जातो. तेथे काही शंका उपस्थित झाल्यास त्याचा पुन्हा उलटा प्रवास होऊन तो महापालिकेकडे येतो. याला बराच कालावधी लागतो. मात्र, आता हा प्रकल्पही मार्गी लागला आहे. त्यातून मैलापाणी शुद्धीकरण केंद्राच्या जागांचा प्रश्‍न होता. मात्र त्या जागाही आता हातात आल्या आहेत. त्याच्या निविदाही निघाल्या आहेत,’ असे बापट यांनी नमूद केले.

“चोवीस तास पाणीपुरवठा योजनेतील 60 पाणीटाक्‍यांचे काम पूर्णत्त्वाला आले आहे. त्यामुळे ती योजनाही मार्गी लागेल,’ असे बापट म्हणाले. याशिवाय “पालखी मार्ग तर तयार होतच आहे. उज्ज्वला आणि आयुष्मान योजनाही यशस्वी झाली आहे.

शौचालय बांधले नाहीत, शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत, सातबारा कोरा केला नाही असे अनेक आरोप केले आहेत. असे असेल तर त्यांनी न्यायालयात तक्रारी दाखल कराव्यात, आम्ही त्याचे पुरावे देऊ,’ असे आव्हान बापट यांनी दिले.

रिक्षा चालकांसाठी स्वतंत्र महामंडळ
“माझ्या राजकीय जीवनात कोणतीही अपेक्षा न ठेवता अनेक सामान्य व्यक्तींना मी मदत करत आलोय. रिक्षा चालक हा त्यांपैकी एक घटक आहे. अनेक रिक्षाचालकांच्या अडचणी मी सोडवल्या आहेत. त्यामुळे रिक्षा चालक हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. भविष्यात मी रिक्षा चालकांसाठी स्वतंत्र महामंडळ सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. वर्षाला 12 रुपये खर्च करून रिक्षा चालकांसाठी विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. एखादा अपघात झाल्यास रिक्षा चालकाला मदत मिळवून देण्यासाठी वेगळा निधी उपलब्ध करण्याचाही माझा विचार आहे. प्रवाशांना मीटर सेवा देण्यासाठी शासनाकडून रिक्षा सुरू करणे, रिक्षाचालकांच्या कल्याणकारी मंडळांची अंमलबजावणी, चुकीच्या धोरणांमुळे वाढलेली रिक्षांची कर्जमाफी, स्मार्ट सिटीत रिक्षाला सहभाग, अत्याधुनिक प्रीपेड थांबे आदी उपाययोजना मला ठोसपणे राबवायच्या आहेत,’ असेही बापट यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.