पुणे – उन्हापासून सावलीसाठी डोक्‍यावर आले छत

मध्यवस्तीतील चौकात थांबणाऱ्यांसाठी अभिनव उपक्रम

पुणे – तापमानाच्या पाऱ्याने चाळिशीचा पारा गाठल्याने कडाक्‍याचे ऊन, तापलेले रस्ते यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा देण्यासाठी शहराच्या मध्यभागात चक्क सिग्नलच्या परिसरात छत टाकून एक अनोखी संकल्पना राबविण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना भर उन्हात सावली मिळवून देण्याकरीता सिग्नलवर कापडी छत तयार करण्यात आले आहे.

मध्यवस्तीतील तीन चौकांमधील 7 सिग्नलवर ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून एकूण 20 ठिकाणी अशी सुविधा करण्यात येणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख विश्‍वस्त आणि नगरसेवक हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात फरासखाना चौक, अप्पा बळवंत चौक, सिटी पोस्ट चौक येथील सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनचालकांसाठी कापडी छप्परची सोय करण्यात आली आहे. याकरीता सुवर्णयुग तरुण मंडळाचे चेतन लोढा, प्रकाश चव्हाण, विनायक रासने, सौरभ रायकर यांसह कार्यकर्त्यांनी सलग तीन दिवस काम करून हे छत उभारण्यात आले आहेत.

सावली मिळताच नियमांचे पालन
प्रत्येक चौकातील सिग्नलवर छत लावताना वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी होईल, याची काळजी घेण्यात आली आहे. झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे संपण्याच्या ठिकाणी जास्तीत जास्त सावली पडेल, अशा सुविधा करण्यात आली आहे. यामुळे वाहनचालक देखील झेब्रा क्रॉसिंगच्या मागे उभे राहत आहेत. त्यामुळे उन्हात मिळणाऱ्या सावलीने दिलासा मिळत असल्याने वाहनचालकांकडून सिग्नल यंत्रणा तसेच वाहतूक नियमांचे आपसूचकच पालन केले जात असल्याचे दिसून येत आहे.

सिग्नलवर थांबलेल्या वाहनचालकांना उन्हाचा त्रास होतो. त्यामुळे त्यांच्याकरीता ही सुविधा करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये अशा प्रकारचा प्रयोग केला असून त्यांच्या प्रेरणेतून पुण्यात प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात आला आहे. इतरही चौकांतही अशी सुविधा देण्यात येणार आहे. यामुळे रस्ते तापण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.
– हेमंत रासने, नगरसेवक

Leave A Reply

Your email address will not be published.