पुणे – बाजाराने घेतला मोकळा श्‍वास

मुख्य प्रवेशद्वाराजवळ वाहने लावण्यास मज्जाव


नियम पाळताच वाहतूक कोंडी झाली कमी

पुणे – मार्केट यार्डतील फळे, भाजीपाला विभागाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वाहने लावण्यास बाजार समिती प्रशासनाने तंबी देताच बाजारातील वाहतुक व्यवस्था सुरळीत झाली. बाजाराने मोकळा श्‍वास घेतल्याचे दिसून येत आहे. दरम्यान तेथे कोणी वाहने लावू नये. लावल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा बाजार समिती प्रशासनाने दिला आहे.

गुलटेकडी येथील मार्केटयार्डात दिवसेंदिवस शेतमालाची आवक वाढत चालली आहे. त्यामुळे शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनांच्या संख्या वाढत आहे. शहर, उपनगरातील खरेदीदारांच्या वाहनांच्या संख्येतही वाढ होत चालली आहे. सध्या आंब्याचा हंगाम जोरात सुरू असून, मार्केटयार्डात शेतमालासह आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे बाजारात होणारी वाहतूक कोंडी सोडविणे प्रशासनाच्या नाकी नऊ येत आहे. वाहतुक कोंडीमुळे शेतमाल गाळ्यांवर पोहचण्यास उशीर होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते. तर, हमाल, खरेदीदार, नागरिकांसह बाजार घटकांनाही वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागतो. तर, दुसरीकडे बाजार समितीच्या कर्मचारी आणि आडते मुख्य प्रवेशद्वारावरूनच वाहने लावत असल्याने वाहतूक कोंडीमध्ये आणखी भर पडत होती. माध्यमांनी यावर प्रकाश टाकल्यानंतर बाजार समितीने मागील आठवड्यापासून मुख्य प्रवेशद्वारावर वाहने लावण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मुख्य प्रवेशद्वारावर वाहने पार्क करणे बंद झाल्याने मागील चार-पाच दिवसांत मुख्य प्रवेशव्दारावरील वाहतूक कोंडी सुटली असून शिवनेरी पथावर होणारी वाहतूक कोंडीही काही प्रमाणात कमी झाली आहे.

बाजार समितीचे नियम सर्वांनी पाळणे आवश्‍यक आहे. यापुढे शिस्तभंग करून मुख्य प्रवेशद्वारावर वाहने पार्क केलेली आढळल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल. मग तो कर्मचारी असो आडते त्याची गय केली जाणार नाही.
– बी.जे.देशमुख, प्रशासक, बाजार समिती, पुणे

Leave A Reply

Your email address will not be published.