दिलासा : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात

पुण्याचे पाणीकपतीचे संकट टळणार

   पुणे : पावसाने ओढ दिल्याने शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने शहरावर पाणीकपातीचे सावट घोंगावत होते. मात्र, अखेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली आहे.रविवारी रात्रीपासून खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांमध्ये दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पाणीसाठाही वाढण्यास सुरुवात झाली आहे. शहारावरील पाणीकपातीचे संकट लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

रविवारी सायंकाळी 6 ते सोमवारी सकाळी 6 पर्यंत खडकवासला धरणात 23 मिमी, पानशेत धरणात 42 मिमी, वरसगाव धरणात 45 मिमी तर टेमघर धरणात 60 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे या चारही धरणात सुमारे 34.18 टक्के पाणीसाठा तयार झाला असून रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने सुमारे 0.14 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. ही वाढ नगण्य असली तरी या पावसामुळे धरणात येणाऱ्या नदी, नाले ओढयातून मोठ्या प्रमाणात पाणी धरणात येत असून हा पाऊस आणखी काही दिवस कायम राहिल्यास पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होईल असा अंदाज प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे. दरम्यान , धरणसाठा खालावल्याने आज महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पाणी नियोजनाबाबत बैठक बोलाविली आहे. मात्र, आता पावसाला सुरुवात झाल्याने ही कपात पुढे जाण्याची शक्यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.