दादांना मस्का कशाला?

अजित पवार यांच्या मनधरणीचे पक्षनेतृत्वाकडून प्रयत्न

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे शरद पवार यांनी केलेले बंड मोडून काढण्यात शरद पवार यांना यश आल्याचे चित्र समोर येत आहे. तरीही अजित पवार यांना परत आणण्याचे आटोकाट प्रयत्न पक्ष नेतृत्वाकडून सुरू आहेत. त्यामुळेच पक्षाचे वरीष्ठ नेते अजित पवार यांच्या निवासस्थानाचे उंबरे झिजवत असल्याचे चित्र आहे. त्यामागे कारण आहे तरी काय? याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात सुरू आहे.

याबाबत नाव न छापण्याच्या अटीवर एका नेत्याने सांगितले की, विधानसभेत बहुमत चाचणीच्या वेळी अजित पवार यांचे समर्थक पक्षाला चकवा देऊन दुहेरी खेळी करू शकतात, असा संशय पक्ष नेतृत्वाला आहे. तो धोका स्वीकारायचा नसल्यामुळे त्यांनाच पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अजित पावार यांच्या समर्थकांना मध्यरात्रीच्या बंडाची कल्पना नव्हती, हे मान्य करण्यास पक्षनेतृत्व तयार नाही. त्यांना जर या आमदारांची मान्यता नसती तर अजित पवार यांनी बंडाचे धाडस केलेच नसते, अशी अनेक नेत्यांची धारणा आहे.

अजित पवार यांच्या मनधरणीचे सहा प्रयत्न पक्षाकडून करण्यात आले. वेगवेगळ्या वेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते त्यांना भेटले. सोमवारी त्यांना छगन भुजबळ आणि जयंत पाटील भेटले. त्यांनी सुमारे तासभर अजित पवार यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर खासदार वंदना चव्हाण यांनीही अजित पवार यांची भेट घेतली. दोन्ही वेळेस अजित पवार यांनी आपला ठामपणा बोलून दाखवला. त्यापुर्वी शनिवारी अजित पवार यांची दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी दोनदा भेट घेतली होती.

रविवारी त्यांना जयंत पाटील दोनदा भेटले होते. विश्‍वासदर्शक ठरावापुर्वी त्यांनी स्वगृही परतावे, असे प्रयत्न करण्यात आले. याशिवाय पवार कुटुंबियांमार्फतही अजित पवार यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शरद पवार यांचे नातू आणि नवनिर्वाचित आमदार रोहित पवार आणि शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी समाज माध्यमांवर दादा पतर फिरा, अशी साद घातली होती. आमचा पक्ष आणि कुटूंबाने एक होऊन शरद पवार यांच्या पाठीशी राहण्याची गरज आहे, असे कळवळून लिहले होते.

यावर शनिवारपासून मौन बाळगून असणाऱ्या अजित पवार यांनी आपण अजूनही राष्ट्रवादी पक्षातच आहोत. आपल्याला 54 जणांचा पाठींबा आहे. शरद पवार हेच माझे नेते आहेत असे ट्‌विट रविवारी दुपारी केले होते. ते शरद पवार यांनी लगेच खोडून काढले होते. राष्ट्रवादी आता कॉंग्रेस आणि शिवसेनेसोबत महा विकास आघाडीत असल्याचे स्पष्ट केले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.