तिरंगी लढतीची चुरस

अकोला लोकसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत होणार आहे. युतीचे उमेदवार म्हणून भाजपचे संजय धोत्रे, कॉंग्रेसचे हिदायत पटेल आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात प्रामुख्याने लढत होणार आहे. याशिवाय बसपचे डॉ. डी. एम. भांडे आणि आम आदमी पक्षाचे प्रा. अजय हिंगणकर हेही निवडणूक रिंगणात आहेत. आणखीही दोन उमेदवार आहेत. एकूण सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, पण यात खरी लढत आहे ती संजय धोत्रे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातच.

– विदुला देशपांडे 

प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात नाही म्हटले तरी खळबळ माजली आहे. त्यातून त्यांनी असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमशी आघाडी केली आहे. त्यामुळे या दोन्ही मतपेट्यांवर आपला एकाधिकार सांगणाऱ्या पक्षांची चांगलीच पंचाईत झाली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात संजय धोत्रे विजयाची हॅट्ट्रिक साधतील असा विश्‍वास भाजपला आहे. तर प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या सोशल इंजिनियरिंगमुळे निवडणुकीत मोठा फरक पडेल असाही एक विचारप्रवाह आहे.

इतर अनेक मतदारसंघांप्रमाणेच अकोला लोकसभा मतदारसंघही कॉंग्रेसच्याच प्रभावाखाली होता. माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे, मधुसुदन वैराळे या मतदारसंघातून विजयी झाले होते. पण 1989 नंतर येथे भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले आणि ते आजतागायत टिकून आहे. तर प्रकाश आंबेडकर यांच्या सोशल इंजिनियरिंगच्या प्रयोगाने सगळ्याच राजकीय पक्षांची झोप उडाली आहे. काही वर्षांपूर्वी मायावतींनी उत्तर प्रदेशात केलेल्या सोशल इंजिनियरिंग प्रयोगाची खूप चर्चा झाली होती, पण हा प्रयोग त्यांच्यापूर्वी प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यात केला होता. भारिप-बहुजन महासंघाच्या माध्यमातून त्यांनी हा प्रयोग केला होता. त्यात त्यांना यशही मिळाले होते. जिल्हा परिषदेवर त्यांचे वर्चस्व निर्माण झाले आणि विधानसभेत आमदारही निवडून गेले. याच प्रयोगामुळे अकोल्यात कॉंग्रेस संपुष्टात आली. जिल्हा परिषद आणि महापालिकेवर सध्या भारिप-बहुजन महासंघाचीच सत्ता आहे. या पक्षाच्या विचाराचे दोन आमदारही आहेत. गेल्या वेळी मोदी लाट असूनही आंबेडकरांनी चुरशीची लढत दिली होती. पण त्यांना कॉंग्रेसच्या बाबासाहेब धाबेकरांमुळे मतविभाजनाचा फटका बसला.

अकोल्यात जात हा घटक लक्षात घेऊन मतदान होते. त्यामुळे सगळेच राजकीय पक्ष इथे जात हा घटक लक्षात ठेवूनच उमेदवारी देतात. आता अकोल्यात चर्चा आहे ती आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची. आणखी कितीही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी खरी लढत होणार आहे ती भाजपचे संजय धोत्रे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यातच.

कॉंग्रेसला इथेही बंडखोरीचा त्रास सोसावा लागलाच. नारायण गव्हाणकर यांनी कॉंग्रेसमध्ये बंडखोरी केली. ते वास्तविक भाजपचे माजी आमदार. नंतर ते कॉंग्रेसमध्ये गेले. यावेळी अकोला लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी बंडखोरी केली आणि स्वत: उमेदवार होण्याची तयारी सुरू केली. त्यांच्यामुळे भाजपची मते फुटण्याचा धोका होता. पण गव्हाणकर यांनी उमेदवारी मागे घेतली. याचा फायदा आता भाजपला होणार आहे.

कॉंग्रेस प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर आघाडी करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नशील होता, पण आंबेडकरांनी कॉंग्रेसला दाद दिली नाही. अकोल्यात या दोघांची आघाडी कॉंग्रेसला लाभदायी झाली असती. पण आता प्रकाश आंबेडकरांचे मोठे आव्हान त्या पक्षासमोर आहे. आंबेडकरांना बौद्ध, मुस्लीम आणि बहुजन समाजातील अन्य जातींची मते मिळू शकतात. कॉंग्रेसने हिदायत पटेल यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे आंबेडकरांना मिळणाऱ्या मुस्लीम मतांत विभाजन होऊ शकते, पण याचा फायदा कॉंग्रेसला कितपत होईल ही शंकाच आहे. संजय धोत्रे यांना मराठा, कुणबी समाजातील बहुसंख्य मते मिळू शकतात. ही मते आपल्याकडे वळवण्याचे आव्हान आंबेडकर आणि पटेल या दोघांपुढेही आहे.

अकोला मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ आहे. त्यातील पाच अकोला जिल्ह्यातील आणि एक वाशिम जिल्ह्यातील आहे. अकोला (पश्‍चिम), अकोला (पूर्व), अकोट, बाळापूर मूर्तिजापूर आणि वाशिम जिल्ह्यातील रिसोड असे हे सहा विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात आहेत.

अकोल्यात शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. या भागातील डाळ उद्योग संपूर्ण देशात दुसऱ्या क्रमांकाचा मानला जातो. याशिवाय कापूस आणि सोयाबीनवर प्रक्रिया करणारे काही उद्योग इथे आहेत. विदर्भातील नागपूरनंतर दुसऱ्या क्रमांकाचे औद्योगिक शहर म्हणून अकोल्याचा लौकिक आहे.

जिल्ह्यात कॉंग्रेसचे अनेक बडे नेते आहेत. पण ते फक्त निवडणुकीपुरतेच सक्रिय असतात अशी त्यांच्याबद्दलची तक्रार आहे. पण कॉंग्रेसमध्ये इथे नवे नेतृत्व तयार झालेले नाही. अकोल्यात कॉंग्रेसमध्ये संतोष कोरपे आणि वसंतराव धोत्रे असे दोन मजबूत गट आहेत. त्यांचा मतदारांवर प्रभावही आहे. पण हे दोघेही प्रचारात मनापासून सहभागी होत नसल्याची कॉंग्रेस कार्यकर्त्यांची तक्रार आहे. याचा फायदा भाजपच्या उमेदवाराला होत आला आहे. भाजपचे भाऊसाहेब फुंडकर येथून तीन वेळा खासदार झाले. प्रत्येकवेळी प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीमुळे कॉंग्रेसच्या मतांचे विभाजन झाले आणि त्याचा फायदा भाजपच्या उमेदवाराला झाला. आताही तीच परिस्थिती आहे. संजय धोत्रे यांना तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्याची संधी आहे. पण त्याचबरोबर त्यांनी या मतदारसंघात विशेष काम केलेले नाही त्यामुळे नाराजीही आहे. या नाराजीचा विरोधक कसा फायदा उठवतात यावर बरेच काही अवलंबून आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.