‘नामसाधर्म्य’ फॉर्म्युला आणि वाढती उमेदवारसंख्या

– हेमचंद्र फडके 

भारतीय राजकारणात राजकीय पक्षांच्या वाढत्या संख्येबरोबरच निवडणुकांमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांची संख्याही वाढत चालली आहे. विश्‍लेषकांच्या मते याचे कारण आपल्याकडे कमी असणारी अनामत रक्‍कम. कोणत्याही लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला अनामत रक्‍कम जमा करावी लागते. कोणत्याही उमेदवाराला त्या मतदारसंघात झालेल्या एकूण मतांपैकी 16.66 टक्‍क्‍यांहून अधिक मते मिळाली असतील तर त्याची अनामत रक्‍कम परत दिली जाते. त्याहून कमी मते मिळाल्यास ही रक्‍कम जप्त केली जाते.

1951-52च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अनामत रक्‍कम 500 रुपये होती. त्याकाळात ही रक्‍कम खूप मोठी मानली गेली. कारण त्यावेळी देशाचे दरडोई उत्पन्न 286 रुपये होते. 1996 च्या लोकसभा निवडणुका पार पडल्या तेव्हा लोकांचे दरडोई उत्पन्न 14,058 रुपये बनले होते. साहजिकच अशा वेळी 500 रुपये अनामत रक्‍कम ही किरकोळ ठरली. परिणामी त्या निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात दाखल झाले. यातील बहुतांश जणांना नशीब आजमावायचे होते. पण नशिबाने त्यांना हुलकावणी दिली. या निवडणुकांमध्ये जवळपास 90 टक्‍के उमेदवारांची अनामत रक्‍कम जप्त झाली. हा अनुभव लक्षात घेऊन 1998 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने अनामत रक्‍कम 20 पटींनी वाढवून 10 हजार रुपये केली. याचा सकारात्मक परिणाम लागलीच दिसून आला. निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली, पण ही स्थिती फार काळ राहिली नाही. पुढील तीन लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवारांची संख्या दुपटीने वाढली. परिणामी पुन्हा एकदा अनामत रक्‍कम वाढवण्याची गरज निर्माण झाली. 2009 मध्ये अनामत रक्‍कम वाढवून 25 हजार रुपये करण्यात आली. 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये वाढलेली उमेदवारांची संख्या लक्षात घेता ही रक्‍कम आणखी वाढवण्याची गरज आहे. कारण आज देशातील नागरिकांचे सरासरी उत्पन्न 92,487 रुपये आहे.

उमेदवारांच्या वाढत्या संख्येमध्ये एक महत्त्वाचा घटक लक्षात घ्यावा लागेल. तो म्हणजे तोतया उमेदवारांचा. एखाद्या तगड्या उमेदवाराच्या मतांचे विभाजन व्हावे यासाठी त्याच नावाची मतदारसंघातील दुसरी व्यक्‍ती शोधून त्याला उमेदवारी अर्ज भरायला लावला जातो. हा राजकीय डावपेचांचा भाग असला तरी यामध्ये चक्‍क मतदारांना अडाणी मानले जाते. नामातील साधर्म्यामुळे त्यांना आपला उमेदवार कोणता आहे हे कळणार नाही असे मानून त्याच नावाचे उमेदवार रिंगणात उतरवले जातात. वास्तविक, सूज्ञ उमेदवार चिन्ह पाहून खातरजमा करून मगच मतदान करतात, हे अशा प्रकारची राजकीय चाल खेळणाऱ्यांना माहीत नसावे. त्यामुळेच देशभरात हे प्रकार पाहायला मिळतात. मागील काळात महाराष्ट्रात सुनील तटकरे यांच्याविरुद्ध दुसऱ्या सुनील तटकरेंनी उमेदवारी अर्ज भरला होता आणि निवडणूक लढवली होती. या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले. अशा बहुतेक तोतया उमेदवारांबाबत हेच घडत आले आहे. मात्र, तरीही अटीतटीचा सामना असेल किंवा अगदी कमी फरकांनी मागील निवडणुका जिंकल्या-हारल्या असतील तर तोतया उमेदवार उभा केला जातो. जेणे करुन त्याने 1000-2000 मते जरी खेचली तरी निकाल पालटू शकतो.

2009 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने अभिनेत्री हेमामालिनी यांना उत्तर प्रदेशातील मथुरा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यांच्याविरोधात रालोदचे जयंत चौधरी होते. हेमामालिनींची मते घटावीत यासाठी अन्य एका हेमामालिनीचा शोध घेऊन तिने अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. निकाल लागले तेव्हा भाजपाच्या हेमामालिनी
विजयी झाल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.