इम्रान खानने भारताच्या निवडणुकीत ढवळाढवळ करू नये : असदुद्दीन ओवेसी

वंचित बहुजन आघाडीची विराट जाहीर सभा

सोलापूर, (प्रतिनिधी) – नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास काश्‍मीरचा प्रश्न सोडवू असे वक्तव्य करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बुधवारी रात्री सोलापुरातील वंचित बहुजन आघाडीच्या विराट जाहीर सभेत सडकून टीका केली. इम्रान खान यांनी भारताच्या निवडणुकीत ढवळाढवळ करू नये.भारत सर्वच बाबतीत सक्षम असल्याचे सांगत कोणत्याही परिस्थितीत मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत असे ठासून सांगितले.

ओवेसी म्हणाले, देशाच्या निवडणुका आहेत. इथे जनता ठरवते की कोणाला पंतप्रधान बनवायचे आणि कोणाला घरी बसवायचे. इमरान इथे मिलिटरी नाही ठरवत की पंतप्रधान कोणाला बनवायचे. मोदींना आम्ही पंतप्रधान बनू देणार नाही. काश्‍मीर कोणाच्या बापाची जाहगिरी नाही तो देशाचाच आहे. इमरान खान तुम्ही आम्हाला शिकवता काय ? 23 ला मोदी पंतप्रधान बनले तर पहिल्यांदा इमरान खान मिठाई खातील, अशा शब्दात ओवेसी यांनी इम्रान खान यांचा समाचार घेतला. वायनाडमधून राहुल गांधींनी सिद्दीकचे तिकिट कापले त्यामुळे तेथील एक मुस्लिम उमेदवार कमी झाला. असे सांगत कॉंग्रेस मुस्लिम समाजाचा केवळ निवडणूकीसाठी वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका करताना ओवेसी यांनी सोलापूरमध्ये मोदी, शिंदेंची हवा नाही केवळ प्रकाश आंबेडकरची हवा आहे, असे सांगितले.

सोलापूर आणि आकोल्यातून लढतोय म्हणून पोटात दुखत आहे. जाहगिरदारी संपेल म्हणून सांगत आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. मी पळपुट्यांना (शरद पवार) विचारतोय की तुम्ही का पळालात? पळपुटेपणा आमच्यात नाही. दोन हात करण्याची संधी आम्ही घालवत नाही.

कॉंग्रेसवाल्यांना चॅलेंज देतो की, सोलापूर आणि अकोला दोन्ही जिंकतो. मी हारलो तरी जिवंत राहतो. शरद पवार तुम्ही बारामती जिंकूनच दाखवा. मी तुम्हाला आव्हान देतोय. जेवढा पैसा खर्च करायचाय तो करा. कमरेखालचे राजकारण करत नाही. कमरेखालचे राजकारण करणार असाल तर याद राखा. लिमिट क्रॉस करु नका नाहीतर आम्ही लिमिट क्रॉस करु, असा इशारा आंबेडकर यांनी दिला.सुशीलकुमार शिंदे तुम्ही मुख्यमंत्री असताना पुण्यातील लॉ कॉलेज रोडवरील मागासवर्गीय हॉस्टेलची जागा मॉलला विकली की नाही ते सांगा. असा सवाल त्यांनी केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.