वाईच्या कचरा डेपोला वारंवार

भीषण आग परिसरात धुराचे लोट, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर
वाई – वाई नगरपालिकेच्या ओद्योगिक वसाहतीतील कचरा डेपोला भीषण आग लागली असून औद्योगिक वसाहतीत धुराचे लोट पसरल्याने कचरा डेपोशेजारून जाणारा रस्ता पालिकेने बंद केला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. दरम्यान वाई नगरपालिकेच्या अग्निशमन बंबच्या सहाय्याने हजारो लिटर पाणी मारण्यात येवूनही पालिकेच्या प्रयत्नांना यश आले नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. वाई नगरपालिकेच्या बंबांनी शर्थीचे प्रयत्न चालू ठेवले आहेत. नियोजनाचा अभाव असल्याने कचरा डेपोला लागलेल्या आगीला आटोक्‍यात आणण्यात अपयश आल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.

वाई नगरपालिकेच्या कचरा डेपो शेजारी भारत पेट्रोलियम गॅसचा मोठा प्रकल्प असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने शिस्तबध्द पध्दतीने आग लागलेला कचरा विझविण्याचा प्रयत्न करायला हवा. परंतु तसे होताना दिसत नाही. पालिकेकडेच नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. कचऱ्यावर खूप लांबून पाणी मारण्यात येत असून वातावरणात भयानक गर्मी असल्याने लांबून मारलेल्या पाण्याचा कसलाही असर कचऱ्यावर होताना दिसत नाही.

पालिकेचा कचरा डेपो ओद्योगिक वसाहतीत असल्याने अनेक कंपन्या या ठिकाणी कार्यरत आहेत. अनेक प्रकल्प गॅस अथवा केमिकलचे असल्याने कंपनीसह कामगारांचा व परिसरातील ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे. यातून एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असाही प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. तसेच आगीबरोबर धुराचे लोट या परिसरात उठत असल्याने कामगारांसह स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्याचाही प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पालिकेच्या कारभाराविषयी परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. आग लावून कचरा निर्मुलन करण्यासाठी पालिकेनेच असे पावूल उचलेले नाही ना? अशी चर्चा स्थानिक ग्रामस्थांमध्ये आहे. कचरा निर्मुलनासाठी कंपोस्ट खत निर्मिती, सारखे प्रकल्प राबवून कचर्याची विल्हेवाट लावू शकतात त्यामुळे असा शॉर्टकटचा मार्ग अवलंबून इतरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न होता कामा नये अशी मागणी जोर धरत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)