युरोपिय चेंबर ऑफ कॉमर्सकडून एका विशेष पुरस्काराने अनिल कपूरचा सन्मान करण्यात आला आहे. बालहक्क विषयक चळवळीमध्ये दिलेल्या सातत्यपूर्ण योगदानाबद्दल अनिल कपूरला कौन्सिल ऑफ युरोपिय चेंबर ऑफ कॉमर्सकडून या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारत दौऱ्यावर आलेल्या युरोपिय संघाच्या शिष्टमंडळाकडून अनिल कपूरला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. “प्लॅन इंडिया’ या बालहक्कांसाठी कार्यरत असलेल्या संघटनेबरोबर अनिल कपूर गेल्या कित्येक वर्षांपासून काम करत आहे.
भारतातील आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट विश्वामध्ये गेल्या 30 वर्षांपासून अधिक काळ अनिल कपूरने योगदान दिले आहे. सिनेमा हे माध्यम केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न ठेवता भारत आणि युरोपिय देशांमधील संबंध वाढवण्याच्या हेतूनेही सिनेमा या माध्यमाचा सुंदर उपयोग करून घेण्यात आला आहे. कारण भारतातल्या बहुतेक सिनेमांचे शुटिंग युरोपात होते आहे. युरोपातील सिनेमांना भारतातील प्रेक्षक आनंदाने स्वीकारत आहेत. तसेच युरोपातल्या सिनेमांमध्ये भारतीय कलाकारांचा सहभाग वाढतो आहे, याबाबत युरोपिय संघाचे भारतातील राजदूत तोमास्झ कोलोस्की यांनी आनंद व्यक्त केला. अनिल कपूरला एक मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.