महाकाय वटवृक्षांच्या मुळावर उठलंय कोण?

बोगदा शेंद्रे रस्त्यावरील प्रकार
दिवसाढवळ्या महाकाय वटवृक्षांचे बुंदे पेटवले

सातारा – बोगदा-शेंद्रे रस्त्यावरील महाकाय वटवृक्षांना काही महाभागांकडून आग लावण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. त्यामुळे या डौलदार झाडांच्या मुळावर उठलयं कोण ? अशा संतप्त सवाल पर्यावरणप्रेमींमधून उपस्थित केला जात आहे. सोनगाव कचरा डेपो ते सोनगाव फाटा या रस्त्याच्या दुतर्फा महाकाय वटवृक्ष आहेत. गेल्या कित्येक दशकांपासून या रस्त्याच्या कडेने हे डौलदार महाकाय वटवृक्ष उभे आहेत. परंतु, काही अज्ञात विघ्नसंतोषी लोकांकडून या वटवृक्षाच्या खोडालाच आग लावून संपूर्ण वटवृक्षालाच नष्ट करण्याचा संतापजनक प्रकार केला आहे.

सातारा शहराच्या पश्‍चिमेकडुन पुणे बंगळूर महामार्गाला जोडणारा बोगदा ते शेंद्रे रस्त्याच्या दुतर्फा गेल्या कित्येक दशकांपासून अनेक महाकाय वटवृक्ष उभे आहेत. पर्यावरणचा समतोल राखण्यासाठी शासन आणि पर्यावरणवादी संघटना यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु, अनेक दशकांपासून उभ्या असलेल्या महाकाय झाडांना भरदिवसा जाळून या सर्व प्रयत्नांना हरताळ फासण्याचे काम काही अज्ञात विघ्नसंतोषी लोकांकडून केले जात आहे. अशाच प्रकारे बोगदा सज्जनगड मार्गावरील अनेक महाकाय झाडांना भरदिवसा जाळून नष्ट करण्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत.

दरम्यान, बोगदा- शेंद्रे रस्त्यावरून रणरणत्या उन्हाळ्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या वटवृक्षाच्या गर्द सावलीतून प्रवास करताना आल्हाददायक वातावरणाचा अनुभव मिळतो. अशा प्रकारे झाडांचे बुंदेच जाळुन संपूर्ण झाडेच नष्ट केली जात असल्याने पर्यावरणप्रेमींमधून तीव्र नाराजी आणि निषेध व्यक्त केला जात आहे. तर या महाकाय झाडांच्या मुळावर उठलयं कोण? याचा शोध घेवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)