“विठ्ठल नामाचा रे टाहो’!

शाळांमधून आषाढी एकादशी उत्साहात पालखी सोहळ्याद्वारे सामाजिक संदेश
पिंपरी  – आषाढी एकादशीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर व उपनगरांमधील शाळांमध्ये आज (गुरुवारी) विद्यार्थ्यांचा पालखी सोहळा रंगला होता. विठु-माउलींचा जयघोष, चिमुकल्या वारकऱ्यांचा उत्साह, डोक्‍यावर तसळशी वृंदावन, विठ्ठल-रूक्‍मिणी व वारकऱ्यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी असे प्रसन्नमय आणि भक्तीमय वातावरण शाळांमधून पहायला मिळाले. महाराष्ट्राच्या दैदीप्यमान वारी संस्कृतीचे दर्शन घडवितानाच बाल वारकऱ्यांनी या सोहळ्याच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश दिले.

ब्रिलियंट स्टार प्री स्कूल
सांगवी – येथील ब्रिलियंट स्टार प्री स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत जनाबाई, संत निवृत्ती, संत सोपान, संत मुक्ताबाई इत्यादी संतांची वेशभूषा केली होती. हातात भगव्या पताका घेऊन, झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचाव बेटी पढाव आदी पर्यावरणपूरक संदेश देत, चालली दिंडी पंढरीला अशा भक्तिगीतासह हरिनामाचा गजर करत ही दिंडी साई मंदिरापर्यंत गेली. श्रीविठ्ठल-रखुमाई प्रतिमेचे पूजन संस्थापिका शांताबाई देवकर यांच्या हस्ते करण्यात आले. रिमझिम पावसाचा आनंद घेत, विठ्ठल नामाचा गजर करत या छोट्या वारकऱ्यांनी उपस्थित सर्वांचीच मने जिंकली. या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका वंदना देवकर व सर्व शिक्षकांनी केले.

राजर्षि शाहू महाराज विद्यालय
चिखली – शरद नगर येथील बोधीसत्व प्रतिष्ठान संचलित राजर्षि शाहू महाराज विद्यालयात निसर्ग दिंडी काढून पर्यावरणाची जनजागृती करण्यात आली. सचिव लहू कांबळे यांच्या हस्ते तुकाराम महाराजांच्या गाथेचे पूजन करून दिंडीस प्रारंभ झाला. यावेळी बोधीसत्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोकूळ गायकवाड, उपाध्यक्ष अंकुश कांबळे, मुख्याध्यापक बाबाजी शिंदे आदी उपस्थित होते. शरद नगर, साने चौक, नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती, घरकुल चौक, शरद नगर या परिसरात ही दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी “वृक्षवल्ली आम्हा सोयरे’, “निसर्ग हाच गुरू’, “ग्रंथ हेच गुरु’, “झाडे लावा झाडे जगवा’, “सुका कचरा, ओला कचरा वेगळा करा’ अशा घोषणा दिल्या. सूत्रसंचालन रूपाली पवार यांनी केले. विकास म्हस्के यांनी आभार मानले. पंकज कांबळे, स्वाती पाटील, देवेंद्र पाटील, दिनकर रनवरे, सुजाता जोगदंड, कोमल गायकवाड, सुवर्णा आरोटे, पूनम सुरवसे, क्रीडा शिक्षक संतोष घरडे, जितेंद्र सूर्यवंशी, प्रमोद रायकर यांनी संयोजन केले.

छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ
पिंपळे गुरव – छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. सौ. शकुंतलाबाई आनंद राव शितोळे प्राथमिक विद्या मंदिर, शिशु विहार, नूतन माध्यमिक विद्यालय, मॉडर्न नर्सरी, सुंदरबाई भानसिंग हूजा गुरू गोविंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने पालखी सोहळा आयोजित केला होता. त्यात विद्यार्थ्यांच्या वीस दिंड्या एकत्र आल्या. उद्योजक सतीश साठे साहेब व शीला साठे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. सांगवी परिसरातील गजानन महाराज मंदिरासमोर दिंडीचे गोल रिंगण झाले. याठिकाणी विविध खेळांचा आनंद विद्यार्थी व शिक्षकांनी घेतला. संस्थेचे खजिनदार रामभाऊ खोडदे, सचिव परशुराम मालुसरे, मुख्याध्यापक शिवाजीराव माने, शोभा वरठी, प्रभाकर महाराज कराळे, दत्तात्रय महाराज ढोरे, रोहिदास महाराज ठाकर, संजय चव्हाण, राजश्री जाधव आदी उपस्थित होते. स्वप्नील महाराज कदम, हेमलता नवले, सीमा पाटील, मनीषा लाड, कैलास म्हस्के, स्वप्नील कदम, दीपाली झणझणे, शीतल शितोळे, सुरेखा खराडे आदींनी संयोजन केले.

संस्कृती प्री स्कूल
चिखली – जीवनज्योत एज्युकेशन फाउंडेशन संचलित गुरुवर्य ऍकॅडमी आणि संस्कृती प्री-स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आयोजित पालखी सोहळ्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा पेहराव केला होता. मात्र विठ्ठल-रूक्‍मिणींची वेशभूषा केलेली जोडी सर्वांचे आकर्षण होती. ज्ञानोबा तुकाराम जयघोष आणि हरीनामाचा जयजयकार करीत दिंडीत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामुळे सर्व परिसर भक्तीमय झाला होता. संचालिका सरीता नेवाळा, संचालक भूषण मावळे, मुख्याध्यापिका ज्योत्स्ना मावळे, समन्वयक संजना नाईक, मोहना संगुरवार, सुवर्णा वाघ यांनी आयोजन केले होते. “स्त्री भृणहत्या रोखा’, “पाणी वाचवा पाणी जिरवा’ हा संदेश दिंडीच्या माध्यमातून देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)