बेशिस्तीमुळे चापेकर चौक “कोंडला’

वाहतूक नियंत्रक दिवे बंद ः उड्डाणपुलाखाली बेकायदा पार्किंग

अतिक्रमण कारवाईत सातत्याचा अभाव

चापेकर चौक परिसरामध्ये टपाल कार्यालय तसेच विविध शाळा, महाविद्यालये, भाजी मंडई, बॅंका, सराफी पेढ्या आदींचे मोठे जाळेच पसरले आहे. ज्येष्ठ नागरीक, पेन्शनर्स, तसेच शालेय विद्यार्थी यांची सतत वर्दळ असते. मात्र, चौकातील अतिक्रमणामुळे या साऱ्यांना रस्ता पार करताना कसरतच करावी लागत आहे. त्यातून कित्येक छोटे-मोठे अपघात होत आहेत. महापालिकेकडून अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात येते. मात्र, कारवाईमध्ये सातत्य नसल्याने अतिक्रमण पथकाची पाठ फिरताच पुन्हा अतिक्रमणे फोफावतात.

चिंचवड – बंद असलेले वाहतूक नियंत्रक दिवे, उड्डाणपूलाखाली बेशिस्तपणे उभी केली जाणारी वाहने, नियम धाब्यावर बसवून वाहने दामटण्याची मानसिकता यामुळे चिंचवडगावातील चापेकर चौकाला वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले आहे.

चापेकर चौकातून बिजलीनगर, आकुर्डी, चिंचवड स्टेशन, पिंपरी, काळेवाडीकडे वाहतूक होते. चिंचवडगावातील प्रसिद्ध महासाधू श्री मोरया गोसावी समाधी मंदिरात दर्शनासाठी दररोज भाविक येतात. त्याचबरोबर विविध पाच भागातून सर्व प्रकारच्या वाहनांची सततची ये-जा चालू असते. पिंपरी-चिंचवड महापालिकेने सततच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीला उपाय म्हणून एल्प्रो कंपनी ते पवना नदीलगत उड्डाणपूल उभारला आहे.

चिंचवड स्टेशनकडून येणारे सर्व प्रकारची वाहने थेट या उड्डाणपूलावरून थेरगाव, हिंजवडी आयटी पार्क, सातारा व मुंबईकडे जाणारे एक्‍सप्रेस हायवे रस्त्यावरून वाहने नेतात, असे असले तरी हा उड्डाणपूल दुहेरी बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. चापेकर चौकात रिक्षा, दुचाकी वाहनांचे पार्किंग त्याच बरोबर विरूद्ध दिशेनेही वाहनांची ये-जा मुळे वाहतूककोंडीत भर पडते. वाहतूक सुरळीत होण्यासाठी सिग्नलची व्यवस्था केली आहे. परंतु, तो बंद अवस्थेत असल्यामुळे विशेष करून संध्याकाळच्या दरम्यान वाहतूककोंडी नित्याचीच बाब झाली आहे. वाहतूक पोलीस याठिकाणी अभावाने दिसतात. त्यामुळे बेशिस्त वाहन चालकांना वेसण कोण घालणार, असा सवाल उपस्थित होत आहे. महापालिकेच्या व वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.