वरुणराजा बरसला… शेतकरी सुखावला…

श्रीगोंद्यात धुवाधार पाऊस

बाजारकरूंचे हाल…

सोमवारी श्रीगोंदा शहरात तालुक्‍याचा आठवडे बाजार भरतो. या बाजारात माल विक्रीसाठी शेतकरी, छोटे मोठे व्यापारी बसतात. सोमवारी दुपारी झालेली जोरदार पावसामुळे विक्रेत्यांचे मोठी धांदल उडाली. पावसाचा वाढता जोर पाहता दोन तास बाजारकरूंचे मोठे हाल झाले. काहींचा माल भिजल्याने तो फेकून देण्याची वेळ आली.

श्रीगोंदा तालुक्‍यात नोंदविला गेलेला पाऊस

श्रीगोंदा तालुक्‍यात मंडळनिहाय नोंदविला गेलेल्या पावसाची आकडेवारी (मिलिमीटर मध्ये) पुढील प्रमाणे- श्रीगोंदा : 79, पेडगाव 39, काष्टी 41, चिंभळे : 61, बेलवंडी 36, देवदैठण 19, मांडवगण 45, कोळगाव : 119, सोमवारी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची ही एकूण आकडेवारी आहे. मात्र सोमवारी दुपारी झालेल्या पावसाची आकडेवारी उपलब्ध झाली नाही.


श्रीगोंदा –
उन्हाचा असह्य होणारा उकाडा, पाण्यासाठी होणारी भटकंती व दुष्काळाची दाहकता संपुष्टात आणणाऱ्या वरुणराने श्रीगोंदा शहरासह तालुक्‍यातील बहुतांश ठिकाणी दमदार एंट्री केली आहे. आठवड्या भरात तीन वेळा जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.

मागील आठवड्यात श्रीगोंदा शहरासह तालुक्‍यातील बहुतांश ठिकाणी पावसाने जोरदार एंट्री केली. पहिल्या दोन पावसात पाणी साचले नसले तरी वातावरणातील उष्णता कमी होऊन गारवा पसरला होता. रविवारी सायंकाळी पावसाच्या हलक्‍या सरी बरसू लागल्या. मध्यरात्रीपर्यंत ही संथधार सुरू होती. सोमवारी सकाळपासून वातावरणात उष्णता पसरली होती. दुपारी 1 वाजेच्या दरम्यान अचानक पावसाला सुरवात झाली. सुमारे दोन तास शहरासह वाडी-वस्तीवर धुव्वाधार पाऊस पडला.शहरातील सखल भागात पाणी साचले होते, तर रस्त्यावरून एखाद्या नाल्याप्रमाणे पाणी वाहत होते. कोरड्या पडलेल्या सरस्वती नदीत देखील पाण्याचा लहान प्रवाह वाहू लागला. या जोरदार पावसामुळे रस्त्यावर काही काळ शांतता परसली होती.

शहरासह तालुक्‍यातील आढळगाव, घोडेगाव, चिंभळा, कोळगाव, टाकळीलोणार, कोसेगव्हान या गावात ही पावसाने जोरदार हजेरी लावली. आज झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीच्या कामाला वेग येणार असून, खरीप हंगामातील पेरणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील वर्षी खरीप हंगामात पावसाने पूर्णतः पाठ फिरविल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता. चालू वर्षी तो खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच बरसल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)