अंकिता पाटील विक्रमी मतांनी विजयी

जिल्हा परिषदेच्या बावडा लाखेवाडी गटात कॉंग्रेसचेच वर्चस्व

बावडा – पुणे जिल्हा परिषदेच्या बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी तब्बल 17 हजार 274 मतांची भरघोस आघाडी घेत विजय मिळवला.

बावडा लाखेवाडी गटाच्या सदस्या व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभा देवी पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी रविवारी (दि.23) मतदान झाले. तर, आज (दि.24) इंदापूर येथे मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात आला.

रविवारी (दि.23) संपूर्ण गटामध्ये एकूण 25 हजार 740 एवढे मतदान झाले. यापैकी नोटा 171 वगळता अंकिता यांना 20 हजार 737 , दिपाली बाळासाहेब कोकाटे 3 हजार 463 , गौरी महादेव मोहिते 512, कांताबाई विलास बोडके 441, कांबळे दिपाली सगाजी 147, गायकवाड नंदाबाई अभिमन्यू 145, तोरणे जयश्री कमलकांत 89 तर भोसले वनिता बाळू 55 एवढी मते प्रत्येक उमेदवारास मिळाली.

या निवडणूक रिंगणात कॉंग्रेसच्या अंकिता पाटील यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने सक्रिय पाठिंबा दिला होता. तसेच या निवडणुकीत इतर सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार उभे केले नव्हते. परंतु, 7 अपक्ष उमेदवारांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला तो केविलवाणाच ठरला. कारण, अंकिता यांच्या तोडीस एकाही उमेदवाराला मते मिळवता आली नाहीत. बावडा येथे हर्षवर्धन पाटील यांनी पत्नी भाग्यश्री पाटील, कॉंग्रेसच्या विजयी उमेदवार व कन्या अंकिता पाटील व चिरंजीव राजवर्धन पाटील तसेच कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या समवेत साधेपणाने विजयोत्सव साजरा केला.

मतदारांनी चांगल्या मताधिक्‍याने निवडून दिले. आता, माझी जबाबदारी वाढली आहे. माजी मंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माझे बाबा हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या गटातील समस्या सोडवण्यासाठी कायम प्रयत्न करू. गटातील मुलभुत समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.
– अंकिता पाटील, नवनिर्वाचित सदस्या, पुणे जिल्हा परिषद


मातोश्री जि. प. सदस्या रत्नप्रभा देवी पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी सर्वांच्याच मागणीनुसार मुलगी अंकिता हिला उमेदवारी दिली. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने सक्रिय पाठिंबा दिला. परंतु, ही लोकशाही आहे, इथे प्रत्येकाला आपला हक्क बजावण्याच अधिकार आहे. तरीही सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या पोटनिवडणुकीत जे सहकार्य केले त्याबद्दल अभारी आहे.
– हर्षवर्धन पाटील, माजी आमदार, इंदापूर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)