पावसाने शेतकरी सुखावला…

सासवड/कापूरहोळ – पुरंदर, भोर, आंबेगावमध्ये दमदार पावसाने तर बारामतीसह पूर्व हवेली पट्ट्यात पावसाची भुरभुर कायम होती. शिरूर, दौंड, खेडमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. परंतु, पावसाने हुलकावणी दिली. खरीपाकरिता सर्वत्र दमदार पावसाची गरज होती. पूर्व मशागतीची कामे सुरू झाल्याने आजचा पाऊस उपयोगी ठरणार आहे.

जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील भागात पावसाने आज चांगली हजेरी लावली. पुरंदर आणि भोरमध्ये दमदार पाऊस झाला आहे. पुरंदर तालुक्‍याच्या पूर्व आणि पश्‍चिम पट्ट्यात पावसाने चांगली हजेरी लावली. दुपारी चार नंतर पाऊस सुरू झाला. 11.03 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद सासवड येथील आचार्य अत्रे प्रतिष्ठानच्या वेधशाळेत झाल्याची माहिती वेधशाळेचे व्यवस्थापक नितीन यादव यांनी दिली. सासवड व परिसरात आज कमाल तापमान 34.6 तर किमान तापमान 24.2 सेल्सिअस होते. आज, सासवडचा आठवडे बाजार होता. अचानक आलेल्या पावसाने भाजी विक्रेत्यांची तारांबळ उडाली. पावसामुळे काही काळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता.

तालुक्‍यातील जवळार्जुन, पांडेश्‍वर, नाझरेकडेपठार, नाझरेसुपे, नायगाव, रिसे पिसे या भागामध्ये मान्सूनच्या पहिल्याच पावसाने दमदार हजेरी लावली. दुष्काळाने हैराण झालेला बळीराजाला पावसाने सुखावला आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबर पासून या भागांमध्ये पाणी, जनावरांना हिरवा चारा उपलब्ध झाला नव्हता; त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुष्काळाला सामोरे जावे लागत होते. रोमणवाडीमध्ये डिसेंबरपासूनच टॅंकरने पाणीपुरवठा होत होता.

कापूरहोळ, नसरापूर परिसरात जोरदार
भोर तालुक्‍यातील कापूरहोळ, नसरापूर, नायगाव, केळवडे, परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी चारच्या दरम्यान विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटांसह पाऊस झाला. जोरदार हजेरी लावल्यामुळे सर्वत्र पाणी पाणी झाले. गेली महिनाभर ढगाळ वातावरण तयार होत होते. शेतकऱ्यांनी शेताची मशागत करून पेरणी साठी रानं तयार ठेवली होती. काही भागात भाताचे तरवे टाकून पावसाची वाट शेतकरी पाहत होते. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.

नसरापूर परिसरात जोरदार पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी झाल्यामुळे वहातुक थंडावली होती. बाजारपेठेतील गटारे तुडुंब भरून वाहत होती त्यामुळे काही दुकानात पाणी शिरले. पाऊस सुरू होताच वीज गायब झाली, पावसामुळे बाजारात शुकशुकाट होता. दुपारी चारला सुरू झालेला पाऊस पाच वाजेपर्यंत सुरू होता. पावसामुळे पुणे सातारा महामार्गवरील वाहतूक संथगतीने सुरू होती. यंदाच्या हंगामात कात्रज, शिंदेवाडी ते सारोळा परिसरात तासभर पहिलाच जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण होते.

बारामती शहरात सांयकाळी पावसाची भुरभुर सायंकाळी उशीरा पर्यंत होती. पावसाला जोर नव्हता, रात्री उशीरापर्यंत केवळ रस्ते ओले झाले होते. यासह हवेली तालुक्‍याच्या पूर्व पट्ट्यात लोणीकाळभोर, थेऊर, उरूळीकांचन, सोरतापवाडी परिसरात भुरभुर झाली. सायंकाळी आकाशात काळेकुट्ट ढग जमून आले होते. त्यामुळे मोठा पाऊस होईल, अशी चिन्हे असतानाच ढग निघून गेले.

इंदापूर शहर वगळता सर्वत्र हजेरी…
इंदापूर तालुक्‍यातील दुष्काळावर आज काही प्रमाणात पावसाचा शिडकावा झाला. तालुक्‍यातील निमसाखर, नीरवांगी वडापुरी, खोरोची, दगडवाडी यासह बहुांशी गावात आद्रा नक्षत्रात विजांच्या कडकडासह पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासुन आकाशात कधी काळे ढग जमून येत होते पण अचानक ढग जावून कडक ऊन पडत होते. आज, मात्र (दि.24) दुपारी चार वाजता काळेकुट्ट ढग आकाशात जमून आले आणि दमदार पावसाला सुरूवात झाली. 15 ते 20 मिनिटे विजेच्या कडकडटांसह जोराचा पाऊस झाला. या पावसाचा काही मोजक्‍या फळबागांना पावसाचा फायदा होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.