टाकळी लोणार येथे तमाशा कलावंतांना जबर मारहाण

दहा ते बारा कलावंत जखमी; श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

लोककला जिवंत राहण्यासाठी कठोर कारवाई व्हावी

बडे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, आम्ही नगरचेच आहोत. ज्या मातीने आम्हाला महाराष्ट्रभर नेले, ज्या नगर जिल्ह्याने आम्हाला मान-सन्मान दिला, त्याच जिल्ह्यातील एका गावाने आमचा अपमान केलाच, शिवाय आम्हाला मारहाण करून तमाशा मंडळातील साहित्याचे नुकसान केले. याची खंत आहेच, शिवाय ही घटना आम्ही कधीही विसरू शकत नाही. या प्रवृत्ती च्या लोकांना चाप बसण्यासाठी व महाराष्ट्राची लोककला जिवंत राहण्यासाठी प्रशासनाने आरोपींवर कठोर कारवाई करावी.

या प्रकरणातील हे आहेत आरोपी…

तमाशा मंडळातील एका महिलेच्या फिर्यादीवरून संदीप सुरेश सुडगे, अशोक माऊली सुडगे, अनिकेत सुडगे, संजय सुडगे, शांताराम सुडगे, गणेश जगदाळे, सचिन सुडगे, नितीन जगदाळे व इतर पाच ते सात जण (सर्व रा. टाकळी लोणार, ता. श्रीगोंदा) यांवर विनयभंगासह, बालकांचे लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा व जबर मारहाण करणे यासाहित विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना घडल्यानंतर काही आरोपी पळून गेले असून, श्रीगोंदा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

श्रीगोंदा – गुरुवारी रात्री टाकळी लोणार (ता. श्रीगोंदा) येथे यात्रेनिमित्त आयोजित हिरामण बडे तमाशा मंडळातील कलावंतांना गावातीलच 20-25 कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली. यामध्ये काही महिला कलावंतांचा विनयभंगही करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

टाकळी लोणार ग्रामस्थांनी यात्रेनिमित्त बडे यांचा तमाशा आयोजित केला होता. तमाशा सुरू होण्यापूर्वी पाच ते सहा कार्यकर्ते तमाशा कलावंताच्या तंबूत घुसले. त्यांनी विनाकारण तमाशा कलावंतांशी हुज्जत घातली. त्यानंतर बडे त्यांच्या पाया पडल्या. आम्ही तुमच्या गावात पोट भरण्यासाठी आलो आहोत. आम्हाला त्रास देऊ नका असेही त्या म्हणाल्या. हल्लेखोरातील एकाने बडे यांना धमकी दिली. तुम्हाला आमचा झटका दाखवितो असे म्हणून तो निघून गेला.

त्यानंतर अर्ध्या तासाने 20-25 तरुणाचे टोळके तमाशा तंबूत घुसले. तमाशातील महिला व पुरुष कलावंतांना बेदम मारहाण केली. काही कलावंत मुलींचा विनयभंगही त्यांनी केला. तसेच तंबूचे नुकसान केले. जखमींना नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी तमाशा मंडळातील एका महिलेने शुक्रवारी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यामध्ये वरील हकीकत नमूद केली असून, या महिलेच्या फिर्यादीवरून टाकळी लोणारमधील 15 जणांवर विनयभंगासह, बालकांचे लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा व जबर मारहाण करणे यासह विविध गुन्हे दाखल करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)