वेणेगाव परिसरात अवैध वाळू तस्करी जोमात

अल्पवयीन मुलांचा होतोय वापर

नागठाणे – वेणेगाव, कोपर्डे (ता.सातारा) येथे वाळू माफियांनी कृष्णा नदीपात्रात चांगलच उच्छाद मांडला आहे. या नदीपात्रातून भरदिवसा मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात असून यासाठी किरकोळ आमिषापोटी अल्पवयीन मुलांचा वापर या वाळूमाफियांकडून होत असून प्रशासनाने वाळूमाफियांच्या मुसक्‍या आवळून भावी पिढी बरबाद होण्यापासून वाचवावी अशी जोरदार मागणी वेणेगाव परिसरातून होत आहे.

हरित लवादाने जिल्ह्यात निर्बंध घातल्याने वाळूला सोन्याची झळाळी आली आहे.त्यातच कृष्णा नदीच्या वाळूला चांगलीच मागणी असल्याने वाळूमाफियांची नजर या नदीपात्रावर आहे.मात्र महसूल प्रशासनाने वाळूमाफियांवर वेळोवेळी कारवाई केल्या.मात्र तरीही हे वाळूमाफिये मुजोर होत आहेत. भरदिवसा येथील नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा केला जात असून मोठ्या प्रमाणावर येथून वाळूची चोरटी वाहतूक केली जात आहे. प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा फायदा घेत हे माफिये नदीपात्रातील वाळूवर चांगलाच डल्ला मारत असून यामुळे प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल मात्र बुडत आहे.

येथील वाळूमाफिये सध्या इतके हुशार झाले आहेत की त्यांनी वाळू चाळणे, भरणे या कामांबरोबरच नदीपात्रात येणाऱ्या अनोळख्या इसमाची माहिती देणे, त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवणे या बाबींसाठी गावातीलच काही अल्पवयीन मुलांचा वापर केला जात असल्याचे समजते. मटण पार्टी व काही किरकोळ स्वरूपाच्या पैशाच्या आमिषाला ही अल्पवयीन मुले या बळी पडत असून यातूनच उद्याचे नवे वाळूमाफिये निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथील वाळूमाफियांच्या संबंधित प्रशासनानेच आता कडक मुसक्‍या आवळाव्यात व भावी पिढी बरबाद होण्यापासून वाचवावी अशी मागणी येथील जनतेतून होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.