कलंदर : लोकप्रियता सलामत तो तिकीट पचास…

-उत्तम पिंगळे

दिल्ली लोकसभेच्या उमेदवारांची घोषणा विविध पक्षांनी केली आणि प्राध्यापकांनी मला सुनवायला सुरुवात केली. म्हणजे दिल्ली हे केवळ निमित्तच झाले.

विसरभोळे : बघा आता नटनट्या तर सोडाच सर्व खेळाडू, कवी व कलाकारही निवडणूक लढवायला सज्ज झालेले आहेत.
मी : होय सर, कुणीही पात्र उमेदवार निवडणूक लढवू शकतो. मग याच खेळाडूंनी किंवा कलाकारांनी काय घोडं मारलं आहे?

विसरभोळे : बरोबर आहे, मी फक्‍त निवडणूक लढवू लागले आहेत असे म्हणालो, लढवू नये असे म्हणालो नाही. पण नीट विचार करा या लोकप्रिय लोकांचा राजकारणात पडण्याचा दर जरा वाढला आहे असे वाटत नाही?
मी : होय, म्हणजे अलीकडे जरा असे जास्त लोक राजकारणात पडू लागले आहेत.

विसरभोळे : बरं मग नीट ऐका, अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर जवळपास सर्वच घटक समजून गेले की ब्रिटिशांनी आपल्याला गुलामगिरीत ठेवले आहे मग प्रखर आंदोलने होत गेली. त्यात जातपात धर्म यांना कोणतेही स्थान नव्हते. ब्रिटिशांना जेव्हा समजले की आता आपल्याला भारत देश सोडावा लागेल (विशेषतः 1942 चले जाव आंदोलनानंतर) तेव्हा त्यांनी हिंदू मुस्लीम तसेच संस्थाने यांच्यात वाद लावून दिले. त्याचा परिणाम म्हणून 1947 ला भारत व पाकिस्तान असे दोन वेगवेगळे देश स्वतंत्र झाले. स्वातंत्र्योत्तर काळानंतर कॉंग्रेस विसर्जित करावी असे महात्माजींनी सांगितले होते; पण सत्तेचा लोभ कोणास नको? कॉंग्रेस निवडणूक लढली. स्वातंत्र्यसैनिक वेगवेगळ्या गटांचे होते. त्यामुळे पुढे कॉंग्रेस फुटून विविध पक्षांची निर्मिती झाली. जनसंघ स्थापण्यासाठी तर नेहरू मंत्रिमंडळातील श्‍यामा प्रकाश मुखर्जींनी मंत्रीपदही सोडले होते. मग विविध पक्षांतून विविध कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक निवडणूक लढवू लागले. आता राजकीय पक्ष फक्‍त राजकारण व सत्ता या दोनच बाबी पाहात आहेत. निवडणुकीस उभे राहणाऱ्यांची पात्रता खाली जात आहे. (पैशांनी नव्हे तर कार्याने) आजकाल कुणीही पैसेवाला निवडणूक लढवू पाहात आहे.
मी : हो, हो पण… म्हणून सेलिब्रिटीजनी निवडणूक लढवू नये, असे नाही?

विसरभोळे : तसे नाही, पूर्वी सरकारही कलाकारांचा मान ठेवायचे. त्यांच्या कार्याचा देशाला उपयोग व्हावा म्हणून विविध कलाकारांना राज्यसभेवरही नेमले जात असे व आताही नेमले जात आहे. तुम्ही नीट विचार करा की जो निवडणूक लढणार आहे त्याला तुमच्या मतदारसंघाची कल्पना आहे का? तेथील समस्या काय आहेत हे त्याला माहिती आहे का? तो कधी तिथे येऊन गेला आहे काय? म्हणजेच सोयीचे राजकारण खेळले जात आहे. पूर्वीचा सेवाभाव व समाजकारण कमी होत असून सत्ता व राजकारण यात नेत्यांना रस राहिला आहे. अशावेळी सत्तेचा गर्व झाल्याने जनता म्हणजे “किस झाड की पत्ती’ असेच मत झाले आहे. अशा वेळी एखाद्या पक्षाने कलाकाराला उमेदवारी दिली की त्याची चर्चा सुरू होते. आज कित्येक उमेदवारांची परिस्थिती अशी आहे की गेली पाच वर्षे त्यांनी काय काम केले तेच दाखवता येत नाही. मग कुणा वलयांकित व्यक्‍तीकडे पाहिले जाते. भले त्या व्यक्‍तीला राजकारणात रस असो वा नसो. अनेक पक्ष मग अशा व्यक्‍तीला गळाला लावण्याकरता तत्पर असतात. मग कलाकार, कवी, नाटककार, खेळाडू असे राजकारणात प्रवेश करीत आहेत. अर्थात अशा ऐनवेळच्या कलाकारांना उमेदवार म्हणून आणले जाणे हे प्रत्येक पक्षाच्या तेथील उमेदवारांचे अपयश आहे हे प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे आणि हो, आपल्याकडे व्यक्‍तिपूजा काही नवीन नाही. अगदी राजकारण्यांपासून, खेळाडूंपासून कोणापर्यंतही जा. म्हणूनच निवडणुकीत तरी आता म्हणावेसे वाटते की जो आवडतो सर्वांना तोची आवडे पक्षांना.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.